राज्यात पाच लाख कृषीपंपाना वीज

0
ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती 
नागपूर : राज्यातील विद्यमान भाजपा-शिवसेनेच्या शासनाने आतापर्यंत विदर्भ मराठवाड्यासह ५ लाख कृषी पंपांना विजेचे कनेक्शन दिले असून सुमारे २.३५ लाख शेतकर्‍यांनी पैसे भरूनही त्यांना विजेचे कनेक्शन मिळाले नाही त्यांना एचव्हीडीएस योजनेअंतर्गत येत्या डिसेंबर २०१९ पर्यंत कनेक्शन दिले जातील, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
प्रकाश गजभिये यांनी कृषी पंप वीज कनेक्शन व या कामासाठी निविदा भरण्यास कंत्राटदार तयार नसल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता.  या संदर्भात बोलताना ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले- कंत्राटदारांचा प्रश्न सीएसआर दराचा आहे. संपूर्ण राज्यात कंत्राटदारांसाठी एकच सीएसआर दर आहे. राज्यात विदर्भ वगळता अन्य ठिकाणी सर्व कंत्राटदार एकाच सीएसआर दरावर कामे करीत आहेत. पण विदर्भातील कंत्राटदारांनी मात्र ३० टक्के अधिक दराची मागणी केली आहे. सीएसआरपेक्षा ३० टक्के अधिक दर देता येणार नाही. बाजारात सध्या या कामाचे काय दर आहेत, याचा अंदाज घेतला जात आहे. ८ टक्के दरवाढ देण्यास आपण मंजुरी दिली होती. पण कंत्राटदारांनी निविदा भरल्या नाहीत. आतापर्यंत कंत्राटदारांसोबत 4 बैठकी झाल्या असून एक शेवटची बैठक घेण्यात येत आहे.  त्या बैठकीनंतर आपण यावर निर्णय घेऊ. राज्यात अनेक ठिकाणी एचव्हीडीएस योजनेचे काम सुरु झाले पण विदर्भात मात्र अजून काम सुरु झाले नाही, याकडेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.