राज्यात पोलिसांसाठी 55 हजार घरांचे निर्माण सुरू

0

भुसावळ । पोलीस हादेखील माणुसच आहे, अनेक अडी-अडचणींचा सामना करीत ते जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र झटत असताना त्यांच्या समस्या लक्षात घेता राज्यात पोलिसांसाठी 55 हजार घरांच्या बांधकामास सुरुवात झाली असल्याची माहिती पालकमंत्री चंदक्रांत पाटील यांनी येथे दिली. जामनेर रोडवरील साईमंदिरा समेारील नूतन पोलीस उपअधीक्षक कार्यालयासह तालुका पोलीस ठाण्याच्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते सोमवारी सकाळी झाले. याप्रसंगी ते बोलत होते.

तक्रारदारांना चांगली वागणूक मिळणे आवश्यक ; पालकमंत्री
ते म्हणाले की, अतिशय देखणी इमारत उभारण्यात आली असून या इमारतीप्रमाणेच पोलिसांनी देखील तक्रारदारांना यापुढे चांगली वागणूक देणे गरजेचे आहे मात्र पोलीस ठाण्याची पायरी चढल्यानंतर लागलीच तक्रार नोंदवून घेतली जात नाही, असा आजवरचा अनुभव आहे. तक्रार दाखल झाली तरी आरोपीला अटक करण्याबाबत दखल घेतली जात नाही त्यामुळे आता हे चित्र बदलणे आवश्यक आहे. राज्यात यापूर्वी शिक्षेचे प्रमाणे अवघे 8 ते 9 टक्के होते कारण पोलिसांसह साक्षीदार फुटत असल्याने आरोपी मुकाट सुटत होते मात्र गेल्या तीन वर्षात चित्र बदलले आहे. आता शिक्षेचे प्रमाण 42 टक्क्यांवर पोहोचले आहे कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी व्यवस्थेत प्रचंड बदल केले आहेत. सण-उत्सवात सर्रास वापरल्या जाणार्‍या डीजेच्या डॉल्बी साऊंड सिस्टीमवर बोट ठेवत पालकमंत्री म्हणाले की, दुसर्‍यांना त्रास देऊन कार्यकर्त्यांना कसला आनंद मिळतो? असा प्रश्‍न करीत पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, असे त्यांनी आवाहन केले. नूतन पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या इमारतीत आरोपीच्या चौकशीसाठी असलेल्या चौकशी खोलीचा सीआयडीसह सीबीआय सारख्या यंत्रणांनाही वापर होवू शकतो, असेही ते शेवटी म्हणाले. नूतन इमारत उभी करण्यात महत्त्वाची भूमिका निभावणार्‍या गृह निर्माण मंडळाचे कार्यकारी अभियंता अरुण नागपूरे व आर्किटेक्ट जयंत सोनवणे यांचा प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी आभार मानले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
कर्नल डी.आर.घाडगे, कर्नल जी.व्ही.कदम, ऑर्डनन्स फॅक्टरी व्यवस्थापक रणजितसिंग ठाकुर, रेल्वे डीआरएम आर.के.यादव, प्रभारी तहसीलदार संजय तायडे, उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्‍वनाथ पाटील, पालिकेचे गटनेता हाजी मुन्ना तेली, भाजपा सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक पिंटू कोठारी, रमेश नागराणी, पुरुषोत्तम नारखेडे, प्रमोद नेमाडे, अमोल इंगळे, उद्योजक तथा स्विकृत नगरसेवक मनोज बियाणी, माजी नगरसेवक अजय भोळे, आरपीआय गवई गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी, परीक्षीत बर्‍हाटे, लक्ष्मण सोयंके, राजू खरारे, शेख पापा शेख कालू, बंगालसिंग चितोडिया, राजीव पारीख, देवा वाणी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

तीन कारणांमुळे होते गुन्ह्यात वाढ
पालकमंत्री म्हणाले की, तीन कारणांमुळे सर्वत्र गुन्ह्यांमध्ये वाढ होत आहे. त्यातील पहिले प्रमुख कारण संस्कार आहे. संस्कार कमी पडत चालल्याने युवा पिढी व्यसनांच्या आहारी गेली आहे. ब्लू व्हेल गेमचे उदाहरण देत त्यांनी यामुळे तरुणाई आत्महत्या करीत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले. दुसरे कारण म्हणजे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक वाटावा अशी कृती होत नाही तर न्याय व्यवस्थेत शिक्षा होण्याचे प्रमाण अल्प असल्याने गुन्हेगारीत वाढ होत असल्याची खंत चंद्रकांत पाटील यांनी प्रसंगी व्यक्त केली.

विचार मंचावर हे होते मान्यवर
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, अल्पसंख्यांक आयोगाचे माजी मंत्री मोहम्मद हुसेन खान (आमीर साहब) जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग, भुसावळ विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल, प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर आदींची विचारमंचावर उपस्थिती होती. पालकमंत्र्यांना भुसावळ शहरासह तालुक्यातील विविध गावातील लोकांनी समस्यांबाबत निवेदन देऊन समस्या सोडवण्याची अपेक्षा व्यक्त केली.

कार्पोरेट कामाची जबाबदारी
शासनाने चांगली इमारत बांधून दिल्याने पोलीस कर्मचार्‍यांची सोय झाली आहे मात्र या कार्पोरेट इमारतीप्रमाणे आता कार्पोरेट काम करणे ही आपली जबाबदारी असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे म्हणाले. चांगल्या समाज निर्मितीसाठी सर्वांनी जाती-पातीच्या भिंती सोडून एकत्र यायला हवे, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सर्वच मान्यवरांना दूरध्वनी करून निमंत्रण दिले व त्यांनी तत्काळ कार्यक्रमास येण्यासाठी होकार दिल्याने त्यांनी आभार मानले.
– पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे

वरणगाव प्रशिक्षण केंद्राचा तिढा सुटावा
महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पोलीस उपअधीक्षक कार्यालयाची इमारत भुसावळची ठरली आहे. पोलीस ठाणे म्हटले म्हणजे सर्वत्र कोंदट वातावरण दिसते येथे मात्र प्रसन्न वातावरण आहे, असे सांगत वरणगाव पोलीस प्रशिक्षण केंद्राचा तिढा सुटावा, अशी मागणी आमदार संजय सावकारे यांनी पालकमंत्र्यांकडे केली. ते म्हणाले की, 1996 मध्ये वरणगाव पोलीस प्रशिक्षण केंद्राचे काम मंजूर झाले. त्यावेळी 10 लाखांचा निधी मंजूर होता. मध्यंतरी हे केंद्र हलवण्यासंदर्भात चर्चा झाल्यानंतर आपण पाठपुरावा केल्यानंतर पुन्हा केंद्राला मंजुरी मिळाली. मुक्ताईनगर दौर्‍यात मुख्यमंत्र्यांनी या केंद्रासाठी शंभर कोटी रुपये मंजूर करण्याची घोषणा केली मात्र नंतर काम कुठे रखडले देव जाणे त्यामुळे पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे.
– आमदार संजय सावकारे

चोपड्यातील समस्याही सुटावी
मंत्री असताना माणुस काय करू शकतो याचे उत्कृष्ट उदाहरण आमदार संजय सावकारे असल्याचे गौरवोद्गार सहकार मंत्री गुलाबराव पाटील यांनी काम काढत सावकारे यांनी त्यांच्या मंत्री पदाच्या इमारतीचे काम मंजूर करून घेतल्याचे ते म्हणाले. चोपडा येथील पोलीस वसाहत 150 वर्षांपूर्वीची ब्रिटीशकालीन असून आपण सभागृहात एलएक्यू मांडला मात्र अद्यापही कामास सुरूवात झालेली नाही. साडेतीनशे स्वेअर फुटात कर्मचारी कसा राहतो? हे त्यांनाच माहिती असे सांगत समस्या सुटायला हवी, असे ते म्हणाले.
– मंत्री गुलाबराव पाटील

जळगावातही कर्मचार्‍यांना घरे
जलसंपदा मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट इमारत भुसावळ येथील आहे. मुंबईत डीजी यांना वेळेत इमारत बांधणार्‍या या ठेकेदारांनाच काम देण्याचे सांगणार आहे. जामनेर येथील पोलीस वसाहतीची प्रचंड दुरवस्था झाली आहे त्यामुळे गृहनिर्माण मंत्री आपलेच आहे त्यांच्याकडून लवकरच कामे करून घेण्यात येतील. जळगाव येथील कर्मचार्‍यांना 144 निवासस्थाने बांधून दिली जाणार आहेत.
-मंत्री गिरीश महाजन

उद्घाटन झाले मात्र घरफोडी होवून बातमी होवू देऊ नका
मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या मिश्कील म्हणाले की, नाशिक येथे एका पोलीस ठाण्याचे उद्घाटन करण्यात आले त्याचे प्रसिद्धी माध्यमांना चांगलेच कव्हरेजही दिले मात्र दुसर्‍याच दिवशी पोलीस ठाण्याच्या कम्पाऊंडला लागून असलेल्या घरात घरफोडी झाली त्यामुळे पोलिसांसह आम्हाला चांगलेच टिकेची धनी व्हावे लागले. त्यामुळे येथे तरी असा प्रकार होणार नाही यासाठी किमान काही दिवस काळजी घ्या, असा टोला महाजन यांनी लगावताच उपस्थितांमध्ये हास्याची लकेर उमटली. मी चांगला बॅटमिंटन खेळाडू आहे त्यामुळे जामनेरहून भुसावळ जाताना येथे काही वेळ थांबण्यासाठी विश्रामगृहाची व्यवस्था व बॅटमिंटन कोर्टाची व्यवस्था करा, अशी सूचना त्यांनी प्रसंगी केली. शहरातील विश्रामगृह गैरसोयीचे असल्याचे ते म्हणाले.

मंत्र्यांनी केले ओक कुटुंबियांचे सांत्वन
भुसावळाच्या माजी उपनगराध्यक्षा तथा तत्कालीन जनसंघाच्या सक्रिय कार्यकर्त्या लिला ओक यांचे नुकतेच निधन झाल्याने ओक कुटुंबियांकडे पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचा ताफा कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर पोहोचला. ओक कुटुंबियांची मान्यवरांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून शोकसंवेदना व्यक्त केल्या.

क्षणचित्रे
10.45 वाजता पालकमंत्र्यांसह सर्व
मान्यवरांचे नूतन इमारतीच्या प्रांगणात आगमन झाले.
जिल्हा दलाच्या बॅण्ड पथकाने मेजर शहा यांच्या नेतृत्वात वाद्य वाजवून मान्यवरांचे स्वागत केले.
कार्यक्रमस्थळी येणार्‍या प्रत्येकाची प्रवेशद्वाराजवळ पोलिसांकडून मेटल डिटेक्टरने तपासणी करण्यात आली.
शहरात प्रथमच तीन मंत्री एकत्र आल्याने जागो-जागी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त दिसून आला.
उपअधीक्षक कार्यालयासह प्रत्येक कक्षाची मान्यवरांनी बारकाईने पाहणी केली.
पुष्पगुच्छ न देता मान्यवरांचे पोलीस अधीक्षकांच्या संकल्पनेतून पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.
अडीच हेक्टर जागेवरील 1500 चौरस फुटात 4.25 कोटी खर्चून इमारतीचे बांधकाम.
महाराष्ट्रातील देखण्या इमारतींमध्ये भुसावळच्या इमारतीचा समावेश – सर्वच मान्यवरांचे गौरवोद्गार
माजी पालकमंत्री तथा आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नाने इमारत उभी राहिल्याचा गौरव पालकमंत्री यांनी आपल्या भाषणात केला.