राज्यात ‘मनु’ जन्माला आल्यासारखे वातावरण!

0
आमदार सुनिल तटकरे यांचे विधानपरिषदेत टीकास्त्र  
नागपूर –  महाराष्ट्राला शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा लाभली आहे. या राज्याने देशाला संत परंपरा दिली. पण इथे पुन्हा एकदा ‘मनु’ जन्माला आल्यासारखे वातावरण निर्माण केले जात आहे की काय अशी भीती आमदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केली. नियम ९७ अन्वये तटकरे यांनी राईनपाडा घटनेवर भाष्य करतानाच सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून इथे राज्य केलं जात आहे. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्ही इथे उभे राहू शकतो त्यांच्या मुलभूत विचारांनाच कलाटणी देण्याचा प्रयत्न केला जातोय असे महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांवरून वाटते. या घटना अतिशय चिंताजनक आणि क्लेषकारक आहेत अशा शब्दात आपल्या भावना तटकरे यांनी व्यक्त केल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा बलुतेदारांना, अठरा पगड जातींना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. व्यवस्थेला लढा दिला. पण या मनुने समाजात वर्णवाद निर्माण केला, व्यवस्था निर्माण होताना प्रत्येकाच्या मनात एक विखार निर्माण केला. एक विशिष्ट समाज म्हणजे गुन्हेगारी करणाराच समाज आहे, असा विचार आज २१ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकाच्या अखेरीसही समाजात असेल तर हा मनुवाद आपल्याला कुठे घेवून जाणार याचा विचार व्हायला हवा असेही ते म्हणाले.
कुठे चाललाय आपला महाराष्ट्र असा प्रश्न आता लोकांना पडू लागला आहे. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून राज्य करणारे आज असा विखार पेरणाऱ्यांना पाठीशी घालत आहेत. राईनपाडा येथील घटनांसारख्या घटनांच्या पाठी कोणीतरी कार्यरत आहे याची सरकारने माहिती घ्यावी. एखादी बैठक घेवून काही होणार नाही तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही तटकरे यांनी यावेळी केली.