राज्यात महिला कैद्यांवर होताहेत अत्याचार!; अजित पवारांचा आरोप

0

मुंबई : राज्यात अनेक तुरूगांमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार होत आहेत. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, असा खळबळजनक गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांनी शुक्रवारी विधानसभेत केला. मंजुळा शेट्ये हत्याप्रकरणी लक्षवेधी सूचनेवर बोलताना, याप्रकरणी अधिकार्‍यांना वाचविण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असल्याचेही ते म्हणाले. यावर विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. मंत्र्यांकडून असमाधानकारक उत्तरे मिळाल्याने विरोधकांनी काही काळ गोंधळ घातला.

राज्याची मान शरमेने खाली
चर्चेला आरंभ करताना जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील तुरूंगांची मर्यादा संपली आहे. एका कारागृहात संख्येपेक्षा जास्त कैदी आहेत. सरकारचे कारागृह व्यवस्थापनाकडे लक्ष नाही. सरकार नव्या कारागृहाची निर्मिती करेल का? असा सवालही त्यांनी विचारला. महाराष्ट्रातील तुरुंगांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. लैंगिक अत्याचार व प्रचंड मारहाण केल्याने मंजुळा शेट्ये यांचा मृत्यू झाला, असे पोस्टमोर्टेम अहवालात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्याची मान शरमेने खाली गेली आहे असे ते म्हणाले.

तुरूगांमध्ये महिलांवर लैगिक आत्याचार
अजित पवार यांनी कारागृहात पुरुष अधिकार्‍यांकडून महिला कैद्यांना चुकीची वागणूक मिळत असल्याचे सांगितले. महिलांना तुरुंगात ’कशालाही’ बळी पडावे लागते. सरकारने एखाद्या महिला वरिष्ठ अधिकार्‍यांकडून या प्रकरणांची चौकशी करावी. या प्रकरणातील अधिकार्‍यांना वाचवण्यासाठी इतर कर्मचारी प्रयत्न करत आहेत. त्यांच्यावर देखील सरकारने कारवाई करावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

जळगाव वासनाकांडाचा उल्लेख
मंत्र्यांनी उत्तर दिल्यानंतरही समाधान न झालेल्या अजित पवार यांनी पुरुष अधिकारी महिला कैद्यांना त्रास देत असल्याचा मुद्दा मांडला. मंजुळा शेट्ये प्रकरणी दोषी अधिकार्‍यांना वाचविण्यासाठी प्रत्येकी दोन हजार वर्गणी गोळा करण्याचे मेसेज फिरत असल्याचे त्यांनी सांगितले. पुन्हा त्याच भ्रष्ट अधिकार्‍यांकडून चौकशी करण्याऐवजी ’चांगला’ अधिकारी नेमावा, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी शरद पवारांच्या काळात मीरा बोरवणकर यांनी जळगाव वासनाकांडाची चौकशी केल्याची आठवण त्यांनी सभागृहाला करून दिली.