राज्यात होणार 100 टक्के विद्युतीकरण

0

बारामती । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना सौभाग्य या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ 25 सप्टेंबर 2017 रोजी केला. या योजनेंतर्गत महावितरणच्या वतीने 31 डिसेंबर 2018 पर्यन्त विद्युतीकरण न झालेल्या कुटुंबांना वीज देऊन राज्यात 100 टक्के विद्युतीकरण करण्यात येणार आहे. राज्यात प्रत्येक घरात वीज पोहचावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे सातत्याने प्रयत्नशील आहेत. महावितरणच्या वतीने सौभाग्य योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. वीजपुरवठा नसलेल्या नागरिकांनी सौभाग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या जवळच्या कार्यालयाशी त्वरित संपर्क साधावा किंवा 1800-200-3435 अथवा 1800-233-3435 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

निशुल्क मिळणार वीजजोडणी
सौभाग्य योजनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीजजोडणी देण्यात येणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना ही वीजजोडणी विनाशुल्क देण्यात येणार असून इतर लाभार्थ्यांना मात्र 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. हे 500 रुपये संबंधित लाभार्थ्याने त्याच्या बिलातून 10 टप्प्यात भरावयाचे आहेत. मोफत वीजजोडणीसाठी लाभार्थी कुटुंबांची पात्रता 2011 च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्‍चित करण्यात येणार आहे. योजनेत वीजपुरवठा प्राप्त झालेल्या ग्राहकांना मासिक वीजबिल भरणे बंधनकारक आहे. मात्र थकबाकीमुळे कायमचा वीजपुरवठा खंडित झालेले घरे,तसेच शेतांमधील घरे या योजनेस पात्र ठरणार नाहीत.

11 लाख लाभार्थ्यांना मिळणार लाभ
सौभाग्य योजनेंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत झालेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे 11 लाख 64 हजार 135 लाभार्थ्याना वीजपुरवठा देण्याचे उद्दिष्ट असून, यापैकी 7 लाख 67 हजार 939 लाभार्थ्यांना पारंपरिक पद्धतीने तर 21 हजार 56 लाभार्थ्यांना अपारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच दारिद्र्यरेषेखालील घरे व सौभाग्य योजनेत पात्र घरांना पूर्वी मंजूर झालेल्या पंडित दिनदयाल ग्राम ज्योती योजनेंतर्गत राज्यातील 3 लाख 96 हजार 196 घरांना वीजजोडण्या देण्याचे काम सुरू आहे.

दुर्गमभागात सौरउर्जेमार्फत वीज देणार
या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉइंट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात येणार आहे. तसेच अतिदुर्गम भागामध्ये ज्या ठिकाणी पारंपरिक विद्युतीकरण करणे शक्य नाही अशा घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा देण्यात येणार आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदीम योजना व इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनाही मोफत वीजपुरवठा देण्यात येणार आहे.