राज्यात ‘होम स्टे टुरीजम’ला मिळणार चालना

0

वर्षभरात १५०० नवीन होम स्टे सुरु करण्याचा निर्णय

एअर बीएनबी, एमटीडीसी यांच्यामार्फत पर्यटन उद्योजकता प्रोत्साहन कार्यक्रम

मुंबई :- राज्यात आता ‘होम स्टे टुरीजम’ला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे. यादृष्टीने आदरातिथ्य (Hospitality) क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय कंपनी एअर बीएनबी आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘पर्यटन उद्योजकता प्रोत्साहन’ कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि एअर बीएनबीच्या धोरण – संवाद विभागाचे जागतिक प्रमुख क्रिस लेहेन यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ही घोषणा करण्यात आली.

एलिफंटा लेणी परिसरात ४० होम स्टे

या कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात एलिफंटा लेणी परिसरात ३५ ते ४० घरांची निवड करुन तिथे होम स्टे सुविधा सुरु केली जाणार आहे. राज्यात येत्या वर्षात १ हजार ५०० होम स्टे सुविधा सुरु करुन या कुटुंबांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या घरांचे यजमान हेच या योजनेचे लाभार्थी उद्योजक असतील. त्यांना आदरातिथ्य, पाककला, पर्यटन, स्थानिक संस्कृती आदींविषयी प्रशिक्षण दिले जाईल. एअर बीएनबीच्या मानकांनुसार या घरांमध्ये दर्जेदार सुविधा, सुरक्षा आदींची उपलब्धता करुन त्यांना देश – विदेशातील पर्यटक हे होम स्टे साठी उपलब्ध करुन देण्यात येतील.

राज्याच्या सर्व भागात होम स्टे टुरीजम विकसीत करणार – मंत्री जयकुमार रावल

याप्रसंगी बोलताना पर्यटन मंत्री जयकुमार रावल म्हणाले की, महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृती, शेती परंपरा, कला – साहित्य याचे देश – विदेशातील पर्यटकांना मोठे आकर्षण आहे. याचा संपूर्ण आनंद घेण्यासाठी पर्यटक हे हॉटेलऐवजी स्थानिक लोकांसमवेत राहणे पसंत करतात. त्यामुळेच होम स्टेची संकल्पना विकसीत झाली असून महाराष्ट्रात एमटीडीसी आणि एअर बीएनबी यांच्या एकत्रीत सहभागातून त्याला चालना देण्यात येईल. जवळपास ९० टक्के इतका पर्यटन उद्योग हा आता ऑनलाईन स्थलांतरीत झाला आहे. पर्यटक आता कोठेही फिरण्यास जाण्यापुर्वी सर्व प्रकारच्या सुविधांची ऑनलाईन बुकींग करतात. त्यामुळेच आता होम स्टेसारखी सुविधा देऊ इच्छिणाऱ्या ग्रामीण पर्यटन व्यावसायीकांनाही ऑनलाईन आणणे गरजेचे आहे. एअर बीएनबी समवेतची भागीदारी यादृष्टीने निश्चितच उपयुक्त ठरेल. या भागीदारीतून प्राथमिक टप्प्यात कोकण किनारपट्टीत होम स्टे व्यवसायाला चालना दिली जाईल. टप्प्याटप्प्याने राज्याच्या संपूर्ण भागात होम स्टे व्यवसाय विकसीत केला जाईल, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात होम स्टे टुरीजमला एअर बीएनबीमार्फत चालना – क्रिस लेहेन
एअर बीएनबीच्या धोरण – संवाद विभागाचे जागतिक प्रमुख क्रिस लेहेन म्हणाले की, एअर बीएनबीने मागच्या वर्षी एमटीडीसी समवेत भागीदारी करुन देश – विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्रात होम स्टे सुविधा पुरविण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ५०० घरांमध्ये होम स्टे सुविधा सुरु करण्यात आली आहे. येत्या वर्षभरात आणखी १ हजार ५०० इतके नवीन होम स्टे सुरु करण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्रातील मागील वर्षभरातील अनुभव खूपच सुखद राहीला. महाराष्ट्रातील लोक खूपच आदरशील असून देश – विदेशातील पर्यटक येथील कला, संस्कृती, खाद्यसंस्कृती जाणून घेऊ इच्छितात. एअर बीएनबीमार्फत याला निश्चितच चालना दिली जाईल, असे ते म्हणाले.

याप्रसंगी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम, एअर बीएनबीचे प्रादेशिक प्रमुख ब्रेंट थॉमस, या कंपनीचे देशाचे प्रमुख अमरप्रीत बजाज, घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर, एमटीडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, उप सरव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आदी मान्यवर उपस्थित होते.