राज्य सरकारकडून विरोधकांना संपवण्याचे षडयंत्र : सीबीआय चौकशीसाठी भाजपा आक्रमक
भुसावळ शहरात प्रशासनाला निवेदन तर वरणगावात रस्ता रोको
भुसावळ : तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना बनावट पुरावे तयार करून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे सत्ताधारी महाविकास आघाडीचे कारस्थान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणले आहे. विरोधकांना नष्ट करून लोकशाही उद्ध्वस्त करण्याच्या या धक्कादायक प्रकाराची सीबीआय चौकशी करावी या मागणीसाठी भुसावळ विभागात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भुसावळात स्थानिक तहसीलदार प्रशासनाला निवेदन देण्यात आले तर वरणगावात रास्ता रोको करण्यात आला.
सरकारी वकीलांचा दुरुपयोग
भारतीय जनता पार्टीचा लोकशाही पद्धतीने मुकाबला करता येत नाही म्हणून महाविकास आघाडीच्या ‘साहेबां’नी सरकारी वकिलामार्फत पोलिस यंत्रणेचा दुरुपयोग करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल, सुभाष देशमुख यांना गुन्ह्यांमध्ये अडकविण्यासाठी कारस्थान रचले. ते आता उघड झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पुराव्यांमध्ये सरकारी वकिलाने महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांच्या गैरव्यवहारांचीही कबुली दिली आहे. हा सर्व प्रकार धक्कादायक असल्याचे निवेदनात नमूद आहे.
भुसावळात यांची होती उपस्थिती
भुसावळ तहसीलदारांना निवेदन देताना भारतीय जनता पार्टी शहराध्यक्ष परीक्षीत बर्हाटे, माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी, सरचिटणीस रमाशंकर दुबे, ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्र नाटकर, गिरीश महाजन, अजय नागराणी, जिल्हा चिटणीस शैलेजा पाटील, विशाल जंगले, अनिरुद्ध कुळकर्णी, लक्ष्मणराव सोयंके, नारायण रणधीर, राजू खरारे, अर्जुन खरारे, बिसन गोहर, अॅड.अभिजीत मेने, किरण मिस्त्री, कैलास झोपे, प्रा.विलास अवचार, श्रेयस इंगळे, चेतन सावकारे, तुषार कुरकुरे आदींची उपस्थिती होती.