राज्य सरकारकडे कोरेगाव-भीमा येथील ‘विजय स्तंभ’ जागेचा ताबा

0

मुंबई : राज्य सरकारकडे कोरेगाव भीमा येथील ‘विजय स्तंभ’ जागेचा ताबा देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले असून हा ताबा १२ जानेवारीपर्यंत राज्य सरकारकडे असणार आहे. ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत विजय स्तंभाच्या जागी सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक महत्त्व असलेल्या विजय स्तंभास ३० डिसेंबर ते २ जानेवारी दरम्यान हजारोंच्या संख्येने नागरिक भेट देतात. त्यामुळे या पूर्वनियोजित कार्यक्रमाची तयारी करण्यासाठी विजय स्तंभ परिसराच्या जागेचा ताबा मिळण्याबाबत अर्ज पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. कार्यक्रम पार पाडल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेली जागा पुन्हा होती तशी करुन देण्यात येणार असल्याची हमी राज्य सरकारच्यावतीने देण्यात आली. ही विनंती मान्य करत न्या. बी.पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने ही जागा राज्य सरकारकडे सोपवली आहे.

कोरेगाव- भीमा परिसराजवळ मागील वर्षी झालेल्या दंगलीच्या हिंसाचाराचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकारच्या देखरेखीत सगळा कार्यक्रम होणार आहे. याच पार्श्वभूमीवर यंदा 1 जानेवारी 2019 रोजी पोलीस आणि प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.