राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे वाढला राज्यात कोरोना

0

रावेर : कोरोना व्हायरसच्या विरुद्ध राज्यातही नागरीकांचा संघर्ष सुरू आहे. मात्र देशामध्ये राज्यात सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यास राज्य सरकारचा नाकर्तेपणा व नेतृत्वच कारणीभूत असून त्यांच्या दुर्लक्षानेच राज्याची ही अवस्था झाली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्यात राज्य अपयशी ठरले आहे. देश संघर्ष करत असताना महाराष्ट्रात मात्र हे महाआघाडीचा सरकार राजकारण करण्यात सातत्याने मग्न असल्याची टीका भारतीय जनता पक्षातर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.

हे राज्य सरकारचेच अपयश
पीपीई किट, हॉस्पिटलची निर्मिती, नागरीरकांना कोरोना विरुद्ध लढण्याकरिता बळ देणे यात सरकारला अपयश आलेले आहे. सर्वसामान्य जनतेला रोजच्या जेवण्याची भ्रांत पडली असताना आघाडी सरकारने कोट्यवधींच्या घोटाळ्यातील वाधवानला परगावी जाऊ देण्यास परवानगी देणार्‍या अमिताभ गुप्ता यांना क्लीन चिट दिली आणि बदल्या न करण्याचा शासन निर्णय जारी केलेला असताना सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाने मात्र मोक्याच्या ठिकाणी आवडत्या अधिकार्‍यांच्या अर्थपूर्ण बदल्या करण्याचा सपाटा लावला आहे. राज्यातील पोलिसांना केवळ कोविडची लागणच झाली नसून राज्यातील पोलिसांवरील हल्ल्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे. केंद्र सरकारने आधारभूत किंमतीच्या आधारावर शेतमाल खरेदी करण्याची यंत्रणा उभी केल्यानंतर सुद्धा राज्य सरकार शेतमाल खरेदी करत नाही त्यामुळे शेतकर्‍यांना बिनव्याजी कर्ज तातडीने उपलब्ध करून देणे त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान भरपाई सुद्धा देण्याची आवश्यकता आहे. आत्तापर्यंत राज्य सरकारने जनतेकरता पॅकेज जाहीर केलेले नाही. रेशनवरच धान्य वाटपात मोठ्या प्रमाणावर घोटाळे चालू आहेत. योजनेचे पैसे लोकांना मिळत नाहीत. पीपीई किटसची उपलब्धता नाही. ठिकठिकाणची विलगीकरण केंद्रात प्राथमिक सोयी -सुविधांचा पुर्णपणे अभाव आहे. वृत्तपत्र वितरणावर बंदी घालणार्‍या या सरकारने दारू दुकानं उघडण्याकरीता विलक्षण तत्परता दाखवली. राज्याच्या मंत्र्यांमध्ये व प्रशासनामध्ये कोणताही समन्वय नाही, असे चित्र आहे. या सर्व गोष्टींचा भारतीय जनता पार्टीचे तर्फे निषेध करण्यात आला. कोरोना विरुद्ध तातडीने पावलं उचलून याला अटकाव करावा व जनतेला आर्थिक पॅकेज घोषित करावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तहसीलदार उशाराणी देवगुणे यांनी निवेदन स्वीकारले.

यांची होती उपस्थिती
यावेळी तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, जि.प.चे माजी आरोग्य व शिक्षण सभापती सुरेश धनके, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, पंचायत समिती सभापती जितु पाटील, तालुका सरचिटणीस प्रा.सी.एस.पाटील, महेश काशिनाथ चौधरी उपस्थित होते.