राज्य सरकारवर अविश्‍वास प्रस्ताव ?

0

मुंबई : मुंबईतल्या सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नसतांनाच आता शिवसेनेसोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारवर अविश्‍वास प्रस्ताव आणण्याची शक्यता असल्याने राजकीय वर्तुळातील हालचाली गतीमान झाल्या आहेत. असे झाल्यास भाजप सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे. अर्थात यात शिवसेनेची भूमिका निर्णायक राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या संभाव्य हालचालींमुळे मुख्यमंत्री फडणवीस हे सतर्क झाले असून ते सर्व परिस्थितीवर नजर ठेवून असल्याची माहिती आता समोर आली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हालचाली

सूत्रांच्या माहितीनुसार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संयुक्तरित्या राज्य सरकारवर अविश्‍वास प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. सध्या भाजपाकडे 122 जागा आहेत. बहुमतासाठी 145 जागा असाव्या लागतात शिवसेने पाठिंबा काढला तर भाजपा सरकार अल्पमतात येऊन पडू शकते. यामुळे फडणवीस सरकारचे भवितव्य हे शिवसेनेच्या निर्णयावर अवलंबून राहणार आहे. अर्थात विरोधकांनी आणलेल्या अविश्‍वास प्रस्तावामुळे शिवसेनेची ‘बार्गेनिंग पॉवर’ वाढू शकते. यातून मुंबईच्या महापौरपदासह अन्य ठिकाणच्या युतीचा मार्गदेखील मोकळा होऊ शकतो. मात्र शिवसेनेनेही ताणून धरल्यास फडणवीस सरकारला धोका पोहचू शकतो. अर्थात मुख्यमंत्री हे सर्व स्थितीवर नजर ठेवून असून पडद्याआडच्या हालचाली गतीमान झाल्याची माहितीदेखील समोर आली आहे.