राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा महागाईभत्ता वाढला

0

मुंबई : राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात राज्य सरकारने 7 टक्क्याने वाढ केली असून, ही वाढ 1 जुलै 2016 पासून देण्यात येणार आहे. गेल्या नऊ महिन्यांची थकबाकीही सरकार एप्रिलच्या पगारात रोखीने देणार आहे. त्याबाबतचा अध्यादेश 21 एप्रिलरोजी राज्य सरकारच्या वित्त विभागाने काढला असून, राज्य सरकारी कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता आता 125 टक्क्यांवरून 132 टक्क्यांवर गेला आहे. सरकारच्या या निर्णयाचा लाभ साडेपंचवीस लाख कर्मचार्‍यांना होणार आहे.

केंद्र सरकारने यापूर्वी त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी सहा टक्क्यांनी महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यानुसार राज्य सरकारनेदेखील 1 सप्टेंबर 2016 रोजी महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार जानेवारीमध्ये या भत्त्यात 6 टक्क्याने वाढ केली होती. तथापि, फरक दिला नव्हता. आतादेखील केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच महागाई भत्त्यात वाढ केली होती. त्यामुळे राज्य सरकारनेदेखील महागाई भत्त्यात वाढ करावी, या मागणीसाठी कर्मचारी संघटनांनी दबाव आणला होता. त्यानुसार, शुक्रवारी राज्याच्या वित्त विभागाने अध्यादेश काढून महागाई भत्त्यात 7 टक्क्याने वाढ केली आहे. 1 जुलै 2016 पासून ही वाढ लागू होणार असून, मागील नऊ महिन्यांचा फरक हा रोखी देण्यात येणार आहे. या दरवाढीने महागाई भत्ता आता 125 वरुन 132 टक्क्यांवर गेला आहे. राज्य सरकारी कर्मचार्‍यांना केंद्रीय कर्मचार्‍यांप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, अशी राज्य सरकारी कर्मचारी संघटनांची मागणी आहे.