अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा प्रयत्न: राज्य सरकार-ताज ग्रुपमध्ये १२५ कोटींचा करार

0

मुंबई: कोरोनामुळे व्यवसाय व उद्योगावर परिणाम झाले. त्यामुळे राज्यावरील आर्थिक संकट अधिक गडद झाले. मात्र आर्थिक परिस्थिती पूर्ववत करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकारकडून पाऊले उचलण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या “मिशन बिगिन अगेन” ला चालना देण्यासाठी ताज ग्रुप आणि राज्य सरकार यांच्यात आज गुरुवारी २७ ऑगस्ट रोजी 125 कोटींच्या गुंतवणूकीचा सामंजस्य करार करण्यात आला आहे. पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही माहिती ट्विटरवरून दिली. ताज ग्रुपने ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळ हॉटेल स्थापित करण्यासाठी सुद्धा सामंजस्य करार केला. ३ वर्षांच्या कालावधीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेळागर-शिरोडा येथे ताज हॉटेल सुरू होणार आहे.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, राज्य मंत्री अदिती तटकरे आदी उपस्थित होते.

‘ताज हॉटेल्स ग्रुप आता अधिकृतपणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आला आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला सिंधुदुर्ग जिल्हा गेल्या २ दशकांपासून या क्षणाची वाट पाहत होता. महाविकास आघाडी सरकारने पहिल्या ३ महिन्यांतच समस्यांचे निराकरण केले आणि आज या संदर्भात सामंजस्य करार झाला’ असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘संपूर्ण पर्यटन विभागासाठी हा एक अत्यंत अभिमानाचा क्षण होता. अनेक हॉटेल ग्रुप महाराष्ट्रात गुंतवणूक करत असल्याने महाराष्ट्र राज्यातील आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना मिळत आहे. यामुळे राज्यातील “मिशन बिगिन अगेन” ला सुद्धा चालना मिळणार आहे असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.