राज ठाकरेंच्या व्यंगचित्राला भाजपकडून व्यंगचित्राद्वारेच प्रत्युत्तर !

0

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीवरून त्यांची खिल्ली उडवणारे व्यंगचित्र राज ठाकरे यांनी काढले होते. मोदींची मुलाखत ही ‘फिक्स’ होती, त्यांचेच प्रश्न आणि त्यांचीच उत्तरे अशा स्वरूपाची ‘मनमोकळी’ मुलाखत होती, असा टोला राज ठाकरेंनी व्यंगचित्रातून लगावला होता. दरम्यान भाजपने देखील राज ठाकरेंना व्यंगचित्राद्वारेच प्रत्युत्तर दिले आहे.

काही महिन्यांपूर्वी ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा संदर्भ घेऊन भाजपाने ‘क्रोध मोदींच्या यशाचा, एक ‘सेटिंगवाली’ मुलाखत’, या मथळ्याखाली व्यंगचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यात राज ठाकरे शरद पवार यांनाच, ‘साहेब बोला काय विचारू’ असे म्हणत आहे. त्यावर, ‘पाळीव पत्रकारांनी सेट करून दिलेले मोदी विरोधी प्रश्न विचारा, उत्तरे तयार आहेत’, असे पवार सांगत असल्याचे दाखवण्यात आले आहे. व्यंगचित्राच्या एका कोपऱ्यात राज ठाकरे यांची ‘बोलघेवडा पोपट’ म्हणून खिल्ली उडवण्यात आली आहे. मनसेचे इंजिन खाली कोसळत असल्याचा टोमणाही भाजपाने मारलाय.