दगडखाणीची जागा पालिकेच्या ताब्यात
पुणे : शहरात निर्माण होणार्या राडारोड्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडून वाघोली येथील दगडखाणीमध्ये स्वतंत्र प्रकल्प उभारला जाणार आहे. या खाणीची जागा महापालिकेच्या ताब्यात आली आहे. या प्रकल्पात प्रामुख्याने महापालिका तसेच खासगी व्यावसायिकांच्या बांधकाम प्रकल्प तसेच इतर कामांमधून निघालेल्या राडारोड्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.
गेल्या काही वर्षांत शहरात बांधकामांची संख्या वेगाने वाढली आहे. अनेक नवीन बांधकाम करताना तसेच जुन्या बांधकामांचा पुनर्विकास करताना मोठ्या प्रमाणात राडारोडा निघतो. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हा राडारोडा नदीपात्र अथवा शहरातील टेकड्यांवर टाकला जात असून यामुळे जैवविविधता धोक्यात आली आहे.
खासगी बांधकाम व्यावसायिकांनाही लाभ
राडारोड्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने चार वर्षांपूर्वी प्रकल्प हाती घेतला होता. त्यासाठी वाघोली येथील दगडखाण जागेची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. ही खाण अखेर महापालिकेच्या ताब्यात देण्यात आली आहे. त्यानुसार, या ठिकाणी प्रकल्पासाठी यंत्रणा पुढील महिनाभरात उभारून प्रत्यक्षात काम सुरू होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पात प्रामुख्याने बांधकामाच्या राडारोड्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. त्यासाठी काम दिलेल्या कंपनीस महापालिकेकडून टिपिंग फी दिली जाणार असून खासगी बांधकाम व्यावसायिकांनाही पालिकेच्या या सेवेचा लाभ सशुल्क घेता येणार आहे. त्यासाठी ठराविक शुल्क आकारले जाणार आहे. या प्रकल्पात आलेल्या राडारोड्याचे आधी वर्गीकरण केले जाणार असून त्यातून वापरता येणारे साहित्य वेगळे केले जाणार आहे. त्यात विटा, लोखंडाचा समावेश आहे. नंतर उरलेल्या राडारोड्याचा चुरा करून त्याच्या पुन्हा विटा तयार करून त्या विक्री करण्यात येणार आहेत. त्यामुळे राडारोड्याचा प्रश्न मार्गी लावण्यास मदत होणार आहे.