मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; आरक्षित क्षेत्राच्या 50 टक्के जमीन उद्यान विस्तारासाठी आरक्षित
मुंबई : भायखळा येथील वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयासाठी आरक्षित असलेली 50 टक्के जागा मुंबई महापालिकेला हस्तांतरीत करण्यात आली आहे. त्यामुळे राणीच्या बागेचे काम लवकरात लवकर करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला निर्देश देण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.
मुख्यमंत्री म्हणाले कि, ई-वॉर्डच्या मंजूर विकास आराखड्यास भूकर क्र. 593 क्षेत्र धारण करणाऱ्या जमीनीवरील वीर जिजामाता भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाचा विस्तार या आरक्षणामध्ये फेरबदल मंजूर झाला आहे. त्यानुसार निव्वळ आरक्षित क्षेत्राच्या 50 टक्के जमीन उद्यान विस्तारासाठी आरक्षित ठेवलेली आहे. विकास योजनेमध्ये आरक्षित असलेल्या क्षेत्राचा ताबा महापालिकेला देण्यात आला आहे.
यावेळी प्राणिसंग्रहालयासाठी सर्व जागा मिळावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केला जावा व त्यासाठी मुख्यमंत्री निर्णय घेतील का? असा प्रश्न जयंत पाटील यांनी विचारला. यावर मुख्यमंत्र्यांनी सगळी जमीन सरकारच्या ताब्यात दिलेली असून अव्हेलेबल जमीन सरकरला दिली असल्याचे सांगितले. आमदार संजय सावकारे यांनी यामध्ये गिरणी कामगारांना घरे देणार का? आणि राणीबागेचा विकास करण्यासंदर्भात प्रश्न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी डिसीआर 58 प्रमाणे काही मिळाले तरच मिळू शकेल. जेवढी जागा गिरणी कामगारांना मिळणार होती तेवढीच मिळणार असल्याचे सांगत मनपाला निर्देश देऊन बागेच्या विकासासाठी सूचना दिल्या जातील असे सांगितले.