राणेंना मंत्रिपद तरी मिळेल का?

0

विधानपरिषद पोटनिवडणुकीत नारायण राणेंना उमेदवारी डावलून भाजपने सावध खेळी खेळली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या घेतलेल्या भेटीची मात्रा भाजपवर अचूक कामी आली. राणे मैदानात असतील तर विरोधकांतर्फे एकच उमेदवार देण्याची ठाकरेंची खेळी होती. ती यशस्वी झाली. प्रसाद लाड यांचा विजय निश्चित असला तरी राणेंना डावलले गेले तो मुद्दा सद्या राजकारणातील चर्चेचा ठरला आहे. आज आमदारकीसाठी डावलले, उद्या मंत्रिपद देतीलच याची काय खात्री? असा प्रश्न लोकांच्या डोक्यात घोळत आहे.

भारतीय जनता पक्षाच्या चतुराईचा चांगलाच अनुभव आता माजी मुख्यमंत्री व उदंड महत्वाकांक्षी नेते नारायण राणे यांना आला असेल. मंत्रिपदाचे आश्वासन घेऊन नवीन पक्ष स्थापन करत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए)मध्ये सहभागी होणारे राणे हे भाजपसाठी गळ्यात अडकलेले हडूक ठरलेले आहेत. भाजपला कोकणात पक्ष वाढविण्यासाठी राणे हवेत आहेत; परंतु राणेंना मंत्रिपद हवे असल्याने ते कसे द्यावे? हा प्रश्न या पक्षाला सतावतो आहे. कारण, राणे मंत्रिमंडळात घेतले तर शिवसेना दूर जाते. सरकार चालविण्यासाठी अगदी काठावरचे बहुमत असल्याने शिवसेनाही हवी आणि राणेही हवेत, अशी काहीशी गोची भाजपची झाली आहे. काँग्रेसचे विधानपरिषद आमदार असल्याने राणे यांनी काँग्रेससह आमदारकीचाही राजीनामा दिला होता. त्या एकाच जागेसाठी आता पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत राणे भाजपकडून आमदार होतील, असे वाटले होते. परंतु, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आडकाठी घातली व राणेंना विरोध दर्शविला. निव्वळ विरोध दर्शवून ते थांबले नाहीत, तर राणेंच्याविरोधात सर्वपक्षीय मोट बांधण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला होता.

कालपर्यंत राणेंना ठाकरे हेच एकमेव शत्रू होते. आता त्यांना काँग्रेसही मोठी शत्रू झालेली आहे. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस या दोन मोठ्या राजकीय शत्रूसह भाजपमधील काही अंतर्गत शत्रूंचा सामनाही राणेंना करावा लागत आहे. खरे तर राणेंच्या मागे जनाधार किती उरला? हाच मोठा सवाल आहे. त्यामुळे कोकण किंवा राज्याच्या इतर भागात राणेंचा खरेच जनाधार असेल तर भाजपला काही तरी फायदा होऊ शकतो. अन्यथा, राणे हे लोढणे गळ्यात गुंतवून भाजपला फायदा तरी काय होईल? तूर्त तरी विधानपरिषद पोटनिवडणुकीचा मुद्दा लक्षात घेता, राणेंबाबत वेट अ‍ॅण्ड वॉचची सावध भूमिका घेतलेली दिसते आहे. भाजपने लक्ष्मीपुत्र प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली आहे. त्याला दोन ठळक कारणे आहेत. एक तर लाड हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत; त्यातही ते अजित पवार यांच्या जवळचे आहेत. त्यामुळे भाजपकडे कमी असलेल्या मतांची बेगमी ते सहज करू शकतात. या निवडणुकीत सगळा लक्ष्मीदर्शनाचा खेळ चालत असतो. अशा प्रकारचे लक्ष्मीदर्शन घडविण्यात लाड यांचा हात कुणीही धरू शकत नाही, हे तर सर्वश्रुतच आहे. त्यामुळे भाजपला लाड यांच्यावरून शिवसेनेने दिलेला पाठिंबा. लाड यांची वैयक्तिक कुवत आणि राष्ट्रवादीतील नेतृत्वाचा त्यांच्याबाबतीत असलेला सुप्त कल पाहाता लाड हे निश्चितच विजयी होतील, याची खात्री वाटते. भाजपने राणेंना मंत्रिमंडळातही घेऊ नये, अशी शिवसेनेची आग्रही मागणी आहे. त्यामुळे आमदारकी तर गेली; शिवसेनेच्या विरोधामुळे मंत्रिपदही नशिबात नाही, अशी परिस्थिती राणेंची झालेली आहे. तरीही पुढील जून-जुलैमध्ये रिक्त होत असलेल्या काही जागांपैकी एखाद्या जागेवर आमदारकीची वर्णी लागेल, असा आशावाद राणेंकडे टिकून आहे. परवा रात्री रात्रभर चाललेल्या खलबतातून तरी राणेंना तसेच आश्वासन मिळालेले आहे.

खरे तर ही पोटनिवडणूक जिंकण्यासाठी 145 मतांचीच गरज आहे. 122 मते भाजपकडे आहेत. उर्वरित मते शिवसेनेच्या पाठिंब्याशिवायही राणे सहज मिळवू शकत होते. तरीही भाजपकडून राणे डावलेले जात असतील तर त्यांना मंत्रिपदापासूनच रोखण्याची खेळी भाजप करत असावे, असा संशयाचा धूर आता राज्याला येऊ लागला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये ज्याप्रमाणे राणेंची कोंडी करण्यात आली, अगदी तशीच कोंडी भाजपही त्यांची करत असावा. प्रसाद लाड यांचा विजय होईल इतपत मते भाजपकडे आजरोजी आहेत. म्हणजेच, 122 स्वतः भाजपची आणि शिवसेना 63 अशी एकूण मते 185 होतात. उद्धव ठाकरे यांचा नारायण राणे यांना विरोध होता; परंतु त्यांचे पुत्र नीलेश राणे यांना विरोध नव्हता. त्यामुळे राणेंऐवजी नीलेशला जरी भाजपने या निवडणुकीत उभे केले असते तरी ते निवडून येऊ शकत होते. परंतु, भाजपने राणेंना टाळले म्हणजे संपूर्ण राणे कुटुंबालाच टाळले, असा त्याचा अर्थ ध्वनीत होत आहे. अलिकडे काँग्रेस सोडल्यानंतर राणे हे राजकारणात अस्पृश्य ठरू लागले आहेत. शिवसेनेच्या तीव्र विरोधामुळे ते भाजपची अडचण आहेत. तद्वतच काँग्रेसच्या विरोधामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेसचीही अडचण आहेत. वास्तविक पाहाता, शरद पवार, अजित पवार व नारायण राणे यांचे अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. राजकारणात व राजकारणाबाहेरही हे संबंध तसे चांगले आहेत. परंतु, राणेंनी काँग्रेसशी काडीमोड घेतली; बरे ती घेताना खा. अशोक चव्हाण यांच्यासह दिल्लीतील काँग्रेस श्रेष्ठींनाही दुखावले. त्यामुळे राणेंच्या बाबतीत राजकीय भूमिका घेताना पवारांची मोठी कसोटी लागत आहे. काँग्रेसचे उमेदवार व सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस खरेच सहकार्य करेल का? हा खरा प्रश्न आहे. तिथेही राष्ट्रवादीची द्विधी परिस्थिती झालेली आहे.

भाजपसोबतचे सलोख्याचे संबंध, प्रसाद लाड हा आपलाच कार्यकर्ता आता भाजपात जाऊन आमदार होऊ पाहतो आहे, आणि तिसरे म्हणजे माने निवडून आले तर काँग्रेसचे विधानपरिषदेतील संख्याबळ एकाने वाढणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस काय करते याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर राणेंची राजकारणात दुर्गतीच झाली. त्यांच्या दुर्देवाचे दशावतार अद्यापही थांबायला तयार नाहीत. काँग्रेसमध्ये राणेंना सडविण्याचीच भूमिका घेतली गेली; भाजपही त्यापेक्षा वेगळे काही करताना दिसत नाही!