रात्रशाळेच्या शिक्षकांवर संक्रांत; शेकडो शिक्षक मातोश्रीवर

0

मुंबई – राज्यभरातल्या जवळपास 1700 रात्र शाळेतल्या शिक्षकांवर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. सरकारच्या 17 मेच्या जीआर नुसार शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. या पार्श्वभूमीवर शिक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून शिक्षकांवर अन्याय न होऊ देता प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले.

काय आहे हे प्रकरण –
राज्यातील 176 रात्रशाळांमधील 1010 शिक्षकांच्या सेवा समाप्त करणे तसेच रात्रशाळांच्या सवलती काढून घेणारा जीआर १७ मे रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता. यामुळे रात्रशाळा चालवणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या निर्णयावर हायकोर्टाने देखील शिक्कामोर्तब केल्याने हे शिक्षक संकटात सापडले आहेत.

रात्रशाळांच्या प्रश्नांवर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्य सरकारकडे रदबदली करण्याचे मान्य केले आहे. जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष आमदार कपिल पाटील यांच्यासमवेत शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, प्रमुख कार्यवाह जालिंदर सरोदे यांनी शुक्रवारी थेट दिल्लीत या प्रकरणी जावडेकरांना साकडे घातले आणि हस्तक्षेप करण्याची विनंती केली. त्यावेळी जावडेकरांनी हे आश्वासन दिले.रात्रशाळांच्या संबंधातल्या शासन निर्णयाला हायकोर्टाने मान्यता दिली असली तरी त्याची अंमलबजावणी नव्या नियुक्त्यांच्या संदर्भात करायला हवी. आहेत त्या कार्यरत शिक्षकांना काढण्याची गरज नाही. हे शिक्षक अत्यंत निष्ठेने आणि तळमळीने शिकवताहेत. एकटे कमावते आहेत. डोक्यावर कर्ज आहे. मुलींची लग्न होऊ घातली आहेत. या स्थितीत त्यांना संरक्षण देणं आवश्यक आहे, असा आग्रह शिष्टमंडळाने धरला. तेव्हा याबाबत शिक्षणमंत्र्यांशी चर्चा करुन मार्ग काढण्याचा प्रयत्न करु, असे जावडेकरांनी सांगितले आहे.