जगात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु आहे तर दुसरीकडे भारताचे शेजारील राष्ट्र हे घुसखोरी आणि दहशतवादी कृत्याला खतपानी घालताना दिसत आहे. गलवान सीमेवरील रक्तरंजिंत सघंर्षानंतर मागील काही दिवसांपासून चीनसोबत भारताचे संबंध अत्यंत तणावपूर्ण असल्याचे पाहायला मिळत आहे. जल, जमीन आणि आकाशातील युध्दासाठी चीनची ताकद मोठी असली तरी आतापर्यंत प्रत्येक आघाडीवर भारताने चीनला जोरदार टक्कर दिली आहे. चीनसोबतच्या युध्दज्वराच्या परिस्थितीत भारतीय वायू सेनेला राफेल फायटर जेटच्या रुपाने मोठी ताकद मिळणार आहे. भारतात येण्यासाठी राफेल लढाऊ विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून उड्डाण केले आहे. पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल लढाऊ विमाने बुधवारी 29 जुलै रोजी भारतात लँडिंग करतील. हरयाणामधील अंबाला एअर फोर्स स्टेशनवर या राफेल विमानांचा तळ असेल. राफेलच्या भारतात येण्यामुळे शेजारील राष्ट्रांना घाम फुटला असेल, हे सांगण्यासाठी कुण्या तज्ञाची आवश्यकता नाही.
भारतीय वायुदलाला गौरवशाली परंपरा आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या वेळी आपल्या वायुदलाकडे लढाऊ विमानांच्या 11 तुकड्या होत्या. फाळणीनंतर साडेसहा तुकड्या भारतात राहिल्या तर साडेतीन तुकड्या पाकिस्तानकडे गेल्या. त्यावेळी ही सर्व लढावू विमाने दुसर्या महायुध्दाच्य वेळेची ब्रिटिश विमाने होती. वायुदलाचे सामर्थ्य ओळखून याला सर्वशक्तीशाली करण्यासाठी अत्याधूनिक तंत्रज्ञानाची कास धरत व काळाची गरज ओळखत नव नवी विमाने भारतीय वायुदलात भरती करण्यात आली. सध्यस्थितीत भारतीय हवाई दलात विविध प्रकारची एकूण 814 लढाऊ विमाने आहेत. यात प्रामुख्याने सुखोई, तेजस, मिग व जग्वारचा प्रामुख्याने ×उल्लेख करावा लागेल. सुखोई-30एमकेआय हे हवाई दलाचे असे लढाऊ विमान आहे, जे 21 व्या शतकाच्या गरजेनुसार बनवले आहे. स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ हे विमान नुकतेच हवाई दलाच्या ताफ्यात दाखल झाले आहे. तर भारतीय हवाई दलाचे दोन इंजिने असलेले जग्वार हे छोटे लढाऊ विमान आहे. हे कमी उंचीवरून उडत लक्ष्यांचा वेध घेणारे विमान आहे. भारतीय हवाई दलातील जग्वार ही महत्त्वाची विमाने आहेत. मिग ही हवाई दलाची भिस्त असणारी लढाऊ विमाने निवृत्तीच्या मार्गावर असताना त्यांची जागा भरून काढण्यासाठी विविध क्षमतांच्या आणि अत्याधुनिक लढाऊ विमानांची गरज आहे. चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाडयांवर एकाच वेळी लढण्यासाठी हवाई दलाकडे लढाऊ विमानांच्या 42 स्क्वॉड्रन अर्थात प्रत्येकी 18 ते 20 विमाने आवश्यक आहेत. सध्या त्यांची संख्या 31 वर आली आहे. ही दरी भरून काढण्यासाठी मध्यम आकाराची, बहुउद्देशीय लढाऊ विमाने तातडीने घेण्याची गरज आहे हे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारच्या कार्यकाळात जाणवले. हाच धागा पकडत यूपीए सरकारने 2007 साली जगातील सहा विमाननिर्मिती कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले. जानेवारी 2012 मध्ये राफेल या विमानाची निवड अंतिम झाली.