नवी दिल्ली : एकीकडे सगळीकडूनच राफेल करारावर टीकेची झोड उडत असतानाच दुसरीकडे हवाई दल प्रमुख बीएस धानोआंनी या कराराचं समर्थन केलं आहे. राफेल डील हे एक अत्यंत धाडसी पाऊल असून यामुळे भारताचे हवाई दल अधिक सक्षम होईल असं मत धानोआंनी मांडलं आहे.
राफेल करारानुसार ३६ लढाऊ विमानं भारत फ्रान्सकडून विकत घेणार आहे. या करारामध्ये भ्रष्टाचार झाला असून फ्रान्स भारताला तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करत नाहीये या दोन मुद्द्यांवर दोन्ही देशातील विरोधकांनी आक्षेप नोंदविला आहे. त्यासोबतच काही दिवसांपूर्वी हिंदुस्थान अॅरॉनॉटिक्स लिमिटेडच्या माजी प्रमुखांनी राफेल विमानं सुखोई प्रमाणेच भारतात बनवता आली असती असं वक्तव्य केलं होतं. याबद्दल विचारलं असता धानोआ म्हणाले की, भारताला सध्या जास्तीतजास्त लढाऊ विमानांची गरज आहे. एचएएल विमान देताना भरपूर दिरंगाई करतं. राफेल विमान २४ महिन्यांच्या आतच भारतीय वायुदलाच्या ताफ्यात दाखल होतील. या विमानांचा वायुसेनेला मोठा फायदा होईल’. हवाई दलाच्या ताफ्यात सध्या अत्यंत कमी नव्या दमाची लढाऊ विमान असल्याचंही त्यांनी सांगितलं. धानोआंच्या आधी व्हाइस एअर चीफ देव यांनी देखील राफेल कराराचे समर्थन केले होते.