नवी दिल्ली: राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करत विरोधक सरकारला लक्ष करीत आहे. रिलायन्सला फायदा मिळवून देण्यासाठी सरकारने हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या सरकारी कंपनीला डावलल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपाचे रिलायन्सने खंडन केले आहे. आमच्यावरील सर्व आरोप चुकीचे असून, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे रिलायन्स कंपनीने म्हटले आहे.
राफेलचे कंत्राट संरक्षण मंत्रालयाकडून मिळाले नसून, ‘डसॉल्ट’कडून मिळाले आहे. राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जात आहे. रिलायन्स डिफेन्स लिमिटेडचे सीईओ राजेश धिंगरा यांनी सांगितले की, ‘रिलायन्स डिफेन्स किंवा रिलायन्स समुहाशी संबंधित कोणत्याही कंपनीला राफेल विमानांशी संबंधित कोणतंही कंत्राट संरक्षण मंत्रालयाकडून मिळालेले नाही. हे सर्व आरोप तथ्यहिन आणि चुकीचे आहेत.’ दोन्ही सरकारमधील करारानुसार सर्व ३६ लढाऊ विमानं फ्रान्सकडून डसॉल्टद्वारे निर्यात केली जाणार आहेत. या विमानांची निर्मिती भारतात होणार नाही, असंही त्यांनी सांगितले.