रामचंद्र गुहा यांचा राजीनामा

0

नवी दिल्ली । संघातील अंतर्गत वाद आणि विविध कारणांनी अडचणीत सापडलेल्या बीसीसीआयची संकटांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयची कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर स्थापन केलेल्या बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीच्या पदाचा प्रसिद्ध इतिहास संशोधक आणि लेखक रामचंद्र गुहा यांनी राजीनामा दिला आहे. गुहा यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर चार जणांची प्रशासकीय समिती नियुक्त केली होती. रामचंद्र गुहा या समितीवर होते. वैयक्तिक कारणांसाठी आपण राजीनामा देत असल्याचे गुहा यांनी सांगितले. अजूनही बीसीसीआयमध्ये लोढा समितीच्या सर्व शिफारशींची अंमलबजावणी झालेली नाही. आयसीसीकडून मिळणा-या महसूलातही मोठी कपात झाली आहे. त्यावरुन बीसीसीआय पदाधिकारी आणि प्रशासकीय समितीमध्ये मतभेद आहेत.

बीसीसीआय आणि समितीमध्ये मतभेद
कॅगचे माजी अध्यक्ष विनोद राय बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख आहेत. माजी क्रिकेटपटू डायना इडुलजी, विक्रम लिमये, विनोद राय आणि रामचंद्र गुहा या चौघांची सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केली होती. लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याची बीसीसीआयची तयारी नसल्याने यावर्षी 30 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचा कारभार चालवण्यासाठी प्रशासकीय समितीची नियुक्ती केली. भारतीय क्रिकेट आणि बीसीसीआयच्या भवितव्यासंदर्भात प्रशासकीय समिती महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता होती. त्यावेळी गुहा यांनी राजीनामा दिला आहे. बीसीसीआयने आयपीएलसाठी निविदा मागवल्या आहेत. पुढच्या पाचवर्षांसाठी प्रसार हक्क विकायचे आहेत. हे निर्णय बाकी असताना गुहा यांनी आपले पद सोडले. एका राज्य, एक मत ही शिफारस लागू करण्यात विनोद राय समिती यशस्वी ठरलेली नाही.

सर्वोच्च न्यायालयाला दिली माहिती
प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद रॉय यांच्याकडे राजीनामा सोपवत असल्याचे गुहा यांनी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले. 14 जुलै रोजी होणार्‍या सुनावणीदरम्यान गुहा यांचा राजीनामा मंजूर केला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2017 मध्ये माजी नियंत्रक व महालेखापरीक्षक विनोद रॉय, रामचंद्र गुहा, विक्रम लिमये आणि डायना एडुल्जी यांच्याकडे क्रिकेट प्रशासन सांभाळण्याची जबाबदारी दिली होती. भारतीय क्रिकेट बोर्डाचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असताना, गुहा यांनी राजीनामा दिला आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या प्रसारणाच्या लिलावासाठीची निविदा प्रक्रिया सुरु केली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने लोढा समितीच्या शिफारशी लागू न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घातले होते. भारतीय क्रिकेट बोर्डाचे तत्कालीन अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांना सर्वोच्च न्यायालयाने पदावरुन हटवले होते.