नवी दिल्ली- सध्या देशातील संवेदनशील मुद्दा बनलेल्या रामजन्मभूमी- बाबरी मशीद खटल्याची उद्या मंगळवार २९ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती. ही सुनावणी रद्द करण्यात आली आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठातील एक न्यायाधीश सुनावणीला उपस्थित राहणार नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
उद्याची सुनावणी रद्द करण्यात आली असली तरी न्यायालयाने नवी तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. न्या.शरद बोबडे २९ जानेवारीला उपस्थित राहणार नसल्यामुळे, सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ २९ जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी घेणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने म्हटले आहे. सरन्यायाधीशांच्या अध्यतेखालील या घटनापीठात शरद बोबडे, धनंजय चंद्रचूड, अशोक भूषण, एस. नझीर या न्यायाधीशांचा समावेश आहे.
मूळ घटनापीठाचे सदस्य असलेले न्या. उदय लळित यांनी माघार घेतल्यामुळे पाच सदस्यांचे नवे खंडपीठ २५ जानेवारीला स्थापन करण्यात आले होते. यात न्या. एन. व्ही. रामण यांना वगळण्यात आले.