आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात
हडपसर : हडपसर रामटेकडी येथे होत असलेल्या नवीन कचरा प्रकल्पाच्या बांधकामाला विरोध करण्याकरिता राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करून आंदोलन केले. यावेळी भाजप सरकार, महापालिका, पालकमंत्री व स्थानिक आमदाराच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आला. यावेळी वानवडी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याला नेऊन पोलीस ठाण्यात नोंद करून सोडण्यात आले.
हडपसरला चार कचरा प्रकल्प, डुकरं, कारकस असे घाणीचे प्रकल्प हडपसरला लादण्यात आले आहेत. भाजपने रामटेकडी येथे लादलेल्या कचरा प्रकल्पाचा निषेध व बांधकामाला विरोध करण्यासाठी हडपसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक योगेश ससाणे, आनंद आलकुंटे, अशोक कांबळे, वैशाली बनकर, पूजा कोद्रे, माजी उपमहापौर निलेश मगर, सुनील बनकर, आबा कापरे, सागर भोसले, सुनिल जगताप उपस्थित होते. यावेळी वैशाली बनकर, अशोक कांबळे यांनी भाषणातून प्रकल्पाला विरोध केला.
ससाणे म्हणाले, रामटेकडी प्रकल्पाला आम्ही सुरुवातीपासून विरोध करत आहोत. प्रकल्पाचा दुष्परिणाम होणार आहे. त्यामुळे आणखी कचरा प्रकल्प करू नका. आहे तोच जुना प्रकल्प नियोजनबद्ध चालू ठेवा आमची हरकत नाही. मात्र नव्या प्रकल्पाचे बांधकाम थांबवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला.