पुणे । गेल्या अनेक दशकांत मूळ सनदेच्या अभावी शिवाजी महाराजांनी रामदासस्वामींना दिलेली सनद संशयास्पद ठरली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना दिलेल्या चाफळ देवस्थानच्या संबंधीच्या सनदेचा शोध लागला आहे. भारत इतिहास मंडळाच्या पाक्षिक सभेत नुकतेच कौस्तुभ कस्तुरे व शिवराम कार्लेकर यांनी या सनदेचे वाचन केले. नव्या सापडलेल्या मूळ चित्रही दरम्यान प्रकाशित केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना एक विस्तृत सनद लिहून काही गावे बक्षीस स्वरुपात दिले होते. यासंबंधीचे पत्र इ. स. 1906 मध्ये धुळ्याच्या शंकरराव देवांनी ‘समर्थांची दोन जुनी चरित्रे’ या ग्रंथात प्रकाशित केले होते. परंतु देवांना या पत्राची मूळ प्रत न मिळता नक्कल सापडली होती. यानंतर इतिहासाचार्य राजवाड्यांनाही या पत्राच्या नकला सापडल्या. याशिवाय अनेक नकला पुणे पुराभिलेखागरात इनाम कमिशनच्या कार्यालयातही सापडतात. या सगळ्या प्रती मूळ पत्राच्या नकला असून मूळ पत्र हे अनेक वर्षे कोणाच्या दृष्टीस पडले नव्हते. अखेरीस मे, 2017ला लंडनच्या ब्रिटीश वाचनालयात या पत्राची मूळ फोटोझिन्कोग्राफ तंत्रज्ञानाने बनवलेली एक प्रत इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यांना सापडली.