नवी दिल्ली । उत्तराखंडमधील एका प्रयोगशाळेत या उत्पादनांची गुणवत्ता चाचणी घेण्यात आली होती. योगगुरू रामदेव बाबा यांची कंपनी पतंजलीची अनेक उत्पादने गुणवत्ता चाचणीत नापास झाली आहेत. उत्तराखंडमधील एका प्रयोगशाळेत या उत्पादनांची गुणवत्ता चाचणी घेण्यात आली होती. माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या माहितीत हा प्रकार समोर आला. या अहवालानुसार हरिद्वार येथील आयुर्वेद आणि युनानी कार्यालयात झालेल्या तपासणीत सुमारे 40 टक्के आयुर्वेदीक उत्पादने ज्यात पतंजलीच्या उत्पादनांचाही समावेश आहे, जी मानकाप्रमाणे नाहीत.
उत्पादने मानकाप्रमाणे नसल्याचे सिद्ध झाले
वर्ष 2013 ते 2016 दरम्यान जमा करण्यात आलेल्या 82 नमुन्यांपैकी 32 उत्पादने गुणवत्ता चाचणीत अनुत्तीर्ण झाली. पतंजलीचे दिव्य आवळा रस आणि शिवलिंगी बीज या उत्पादनांचाही यात समावेश आहे. ही उत्पादने मानकाप्रमाणे नसल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या महिन्यात लष्कराच्या कँटिनमध्येही पतंजलीच्या आवळा ज्यूसवर बंदी घालण्यात आली होती. पश्चिम बंगालमधील एका प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत पतंजलीची उत्पादने अनुत्तीर्ण झाल्यानंतर लष्कराकडून ही कारवाई करण्यात आली होती. उत्तराखंड सरकारच्या प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, आवळा रसमध्ये निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा अधिक प्रमाणात पीएचची मात्रा आढळून आली. पीएचची मात्रा 7 पेक्षा कमी असल्यास पित्त आणि इतर आरोग्याच्या समस्या उद्धभवतात. शिवलिंगी बीजबाबतही प्रतिकूल अहवाल आला आहे.
प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न
पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आणि रामदेव बाबांचे सहकारी आचार्य बालकृष्ण यांनी प्रयोगशाळेचा अहवाल फेटाळला आहे. शिवलिंगी बीज हे एक नैसर्गिक बीज आहे. आम्ही यामध्ये काहीच बदल करू शकत नाही, असा दावा बालकृष्ण यांनी केला. पतंजलीची प्रतिमा खराब करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला.
उत्पादने घरोघरी पोहोचली
पतंजलीच्या उत्पादनांशिवाय आयुर्वेदचे इतर 18 नमुने जसे अविपत्तिकरा चुर्ण, तलिसदया चुर्ण, पुष्यनूका चुर्ण, लवण भास्कर चुर्ण, योगराज गुग्गूल, लक्षा गुग्गूल हेही मानकांप्रमाणे आढळली नाहीत. पतंजलीचे अनेक एफएमसीजी उत्पादने घरोघरी पोहोचली आहेत. कंपनीने सर्वच प्रकारची उत्पादने बाजारात उतरवलेली आहेत. साबण, पीठ, ज्यूस, डिटर्जंट पावडरपर्यंत अनेक उत्पादने पतंजलीने आणली आहेत.