रामनवमीला पू. शुकदास महाराज संजीवन समाधी सोहळा

0

तपोमूर्ती स्वामी हरिचैतन्य सरस्वती महाराजांच्या श्रीरामकथेचे आयोजन
राज्यभरातून भाविकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची लाभणार उपस्थिती

हिवरा आश्रम : दीड कोटी रुग्णांना व्याधीमुक्त करणारे कुशल धन्वंतरी तथा विवेकानंद आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष, निष्काम कर्मयोगी पूज्यनीय शुकदास महाराज यांच्या संजीवन समाधीला येत्या रामनवमीरोजी (दि.25 मार्च) वर्षपूर्ती होत आहे. त्यानिमित्त पहिल्याच संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन विवेकानंद आश्रमाच्यावतीने करण्यात आलेले आहे. यानिमित्त तपोमूर्ती स्वामी हरिचैतन्य सरस्वती महाराज यांच्या श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले असून, दि.22 ते 25 मार्चपर्यंत ही संगीतमय कथा चालणार आहे. तर दररोज रात्री 8 ते 10 वाजेदरम्यान राज्यातील नामवंत कीर्तनकारांच्या हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यभरातून दीड लाख भाविक या सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी व्यक्त केली. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसाद वितरणाने संजीवन समाधी सोहळ्याची सांगता होणार आहे.

पूज्यनीय शुकदास महाराज यांनी रामनवमीच्या दिवशी समाधीस्थ महानिर्वाण केले होते. या समाधी सोहळ्यानिमित्त 22 ते 25 मार्चदरम्यान संगीतमय श्रीराम कथा व हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री श्री 1008 स्वामी हरिचैतन्य सरस्वती महाराज यांच्या अमृततुल्य वाणीतून श्रीराम कथा ऐकण्याचे सद्भाग्य लाखो भाविकांना प्राप्त होणार असून, हे अमृतपाण दररोज दुपारी एक ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान चालणार आहे. तर शेवटच्या दिवशी सकाळी 10 ते दुपारी दोन यावेळेत श्रीरामकथा पार पडेल. तसेच, दिनांक 22 मार्चरोजी रात्री 8 ते 10 हभप. बाजीराव महाराज जवळेकर, गीता मंदीर पैठण, दिनांक 23 मार्चरोजी हभप. प्रज्ञाचक्षु मुकुंदकाका जाटदेवळेकर, पंढरपूर, दिनांक 24 मार्चरोजी हभप. गोविंद महाराज चौधरी, पंढरपूर यांचे तर दिनांक 25 मार्चरोजी दुपारी साडेचार ते सहा वाजेदरम्या वेदांताचार्य हभप. गजाननदादा शास्त्री, जालना आणि रात्री 8 ते 10 दरम्यान हभप. अशोक महाराज जाधव, पुणे यांचे हरिकीर्तन आयोजित करण्यात आले आहे. रामनवमीला मुख्य संजीवन समाधी सोहळा पार पडणार असून, यानिमित्त पूज्यनीय महाराजश्रींच्या समाधीस्थळी विविध धार्मिक विधी व पूजन पार पडणार आहे. तसेच, राज्यभरातून आलेल्या भाविकांसाठी समाधीस्थळ दर्शनासाठी खुले असणार आहे. मुख्य पूजाविधीनंतर दुपारी दोन ते चार वाजेदरम्यान भाविक-भक्तांना महाप्रसादाचे वितरण केले जाणार असल्याची माहितीही विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर. बी. मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, विष्णूपंत कुलवंत यांनी दिली आहे.

सोहळा सोशल मीडियावर ऑनलाईन
संगीतमय श्रीराम कथा व संजीवन समाधी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण राज्यासह देश-विदेशातील भाविकांना ऑनलाईन पाहाता येणार आहे. विवेकानंद आश्रम युट्यूब चॅनलवर हा सोहळा दिनांक 22 मार्चपासून पाहता येईल. याच सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण विवेकानंद आश्रमाच्या फेसबुक पेजसह ट्वीटरवरदेखील केले जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन विवेकानंद आश्रमाच्या आयटी टीमद्वारे करण्यात आले होते.

“संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या अलंकापुरी आळंदीत त्यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा होत असतो. त्यानंतर महाराष्ट्रात साजरा होणारा पूज्यनीय शुकदास महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा हा दुसरा सोहळा ठरणार आहे. युगाचार्य स्वामी विवेकानंद यांच्या विचारांना जीवनध्येय माणून पू. शुकदास महाराजांनी कोट्यवधी दीन, दलित, उपेक्षितांच्या सेवेसाठी स्वत:ला समर्पित केले. त्यांनी आयुष्यात कधीही सत्संगाचे भव्यदिव्य सोहळे घेतले नाही, परंतु सुमारे दीड कोटी रुग्णांना अ‍ॅलोपॅथीसारख्या अतिप्रगत चिकित्सापद्धतीद्वारे व्याधीमुक्त केले. त्यांच्या समाधीस्थ महानिर्वाणास रामनवमीला वर्षपूर्ती होत आहे. त्यानिमित्त राज्यभरातून येणार्‍या भाविकांसाठी श्रीरामकथा, महाप्रसाद आणि समाधी पूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.”
– आर. बी. मालपाणी, अध्यक्ष विवेकानंद आश्रम, तथा भगवत्गीतेचे चिंतनकार