रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपती निवडणुकीसाठी अर्ज दाखल

0

नवी दिल्ली ।  भाजपप्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. प्रचंड शक्तीप्रदर्शनाद्वारे भाजपकडून त्यांचा अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, राजू शेट्टींसह भाजपच्या मित्रपक्षांचे नेते आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.मात्र यावेळी प्रकर्शाने जाणवणारी बाब म्हणजे शिवसेनेची अनुपस्थिती होय.

उध्दव ठाकरे सोडून शिवसेनेच्या कोणत्याही सदस्याला रामनाथ कोविंद यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नव्हते, म्हणून शिवसेनेचे अनुपस्थिती होती.
खा. आनंदराव अडसूळ, शिवसेना

शिवसेनेकडून कोणीही उपस्थित नव्हते. कोविंद फॉर्म भरतेवेळी शिवसेना सोडून एनडीएचे सगळे घटक पक्ष उपस्थित होते. मात्र कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेनेकडून अनंत गीते, संजय राऊत आणि आनंदराव अडसूळ या तिघांच्या सह्या आहेत. रामनाथ कोविंद यांचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील विजय निश्चित मानला जातो आहे.

‘देशाचे संविधान माझ्यासाठी सर्वोच्च आहे. मला पाठिंबा देणार्‍यांचे मी आभार मानतो. देशाची सुरक्षा ही आपली जबाबदारी आहे. मी जेव्हापासून राज्यपाल झालो आहे, तेव्हापासून मी कोणत्याही पक्षाचा नाही. राष्ट्रपती पद आणि राजकारणाचा कोणताही संबंध असू नये,’
रामनाथ कोविंद, राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

कोविंद यांना 61 टक्के मते मिळण्याची शक्यता
भाजपप्रणित एनडीएसोबतच संयुक्त जनता दल, बिजू जनता दल या पक्षांनीदेखील कोविंद यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे रामनाथ कोविंद यांना 61 टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. एकट्या भाजपकडे 48.6 टक्के मते आहेत. त्यामुळे रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित आहे. रामनाथ कोविंद उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीसामी, तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि ओडिशाचे मंत्री सूर्य नारायण पात्रो, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंह, आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांचिही उपस्थित होती.