राममंदिराचा मुद्दा हिंदुत्ववादी संघटनांनीच गुंडाळला; शिवसेनेचा सरकार, संघ, विहिपवर निशाणा

0

मुंबई-देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच राम मंदिराचा मुद्दा ज्वलंत बनला आहे. यावरून बरेच राजकारण होत आहे. दरम्यान आज पुन्हा यावरून शिवसेनेने मोदी सरकार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद यांच्या भूमिकेवर टीका केली आहे. ‘सामना’तील अग्रलेखातून शिवसेनेने टीका केली आहे.

राम मंदिराबाबत मोदी सरकारकडून होत असलेली टोलवाटोलवी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि विश्व हिंदू परिषदेने बदलेल्या भूमिकेवर शिवसेनेने टीका केली आहे. निवडणुकीनंतर मंदिराचे पाहू असे बोलणे म्हणजे शरयूत ज्यांनी बलिदान दिले त्यांच्या बलिदानास नाकारण्यासारखे आहे. राममंदिराचा विषय हिंदुत्ववादी संघटनांनीच गुंडाळून ठेवला आहे, अशी टीका ‘सामना’तून करण्यात आली आहे.

अयोध्येत जाऊन येताच धर्मसभा व हुंकार सभांचा जोर वाढला. राममंदिर उभारणीच्या श्रेयवादात शिवसेनेला पडायचे नाही. श्रेय तुम्हीच घ्या, पण एकदाचा प्रभू श्रीरामाचा वनवास संपवा, असे आवाहन शिवसेनेने केले आहे.

केंद्रात कोणाचेही सरकार असो लोकसभा निवडणुकीनंतर ‘संघ’ राममंदिर उभारणीस सुरुवात करेल असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाहीर केले आहे. दोन दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने हीच भूमिका मांडली. याचा अर्थ असा की, राममंदिराचा विषय हिंदुत्ववादी संघटनांनीच गुंडाळून ठेवला आहे. निवडणुकीनंतर मंदिराचे बघू म्हणजे काय बघणार?, असा सवाल करत मोदी सरकारने २०१९ च्या आधी अध्यादेश काढून अयोध्येत राममंदिर उभारणी सुरू करावी अशी भागवंतांचीच मागणी होती, हे त्यांनी आवर्जुन सांगितले.