जागतिक पर्यावरण दिनी योगी(युथ ऑर्गनायझेशन फॉर ग्रीन इंडिया) ह्या संस्थेचे उद्घाटन फेसबुक लाइव्ह च्या माध्यमातून जलपुरुष राजेंद्र सिंह राणा यांच्या हस्ते ऑनलाईन स्वरूपात पार पडला. योगी हि शाश्वत ग्रामविकास,पर्यावरण व कृषी क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या विचारांनी प्रेरित युवकांची चळवळ आहे.सध्याच्या घडीला संपूर्ण महाराष्ट्रभरातील पर्यावरणप्रेमी युवक यात मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत.शाश्वत हरित भारताच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी सुरु झालेल्या ह्या चळवळीचा उद्घाटन सोहळा गांधीवादी तत्वज्ञ तुषारजी गांधी यांच्या अध्यक्षेतेखाली पार पडला तर प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध पर्यावरणवादी लेखिका वीणाताई गवाणकर यांची उपस्थिती होती.योगीच्या कार्यकर्त्यांनी वटवृक्षाचे रोपण करून कार्यक्रमाला सुरुवात केली.योगीचे मार्गदर्शक मनोज गोविंदवार व पर्यावरणवादी कार्यकर्ता मिलिंद पगारे,नाशिक यांनी देखील मार्गदर्शन केले.
संस्थेचे संस्थापक गिरीश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात योगीची भूमिका मांडताना सांगितले कि “आज कोरोना,टोळधाड,चक्रीवादळ सारख्या आपत्ती आपल्या समोर उभ्या असतांना आपण निसर्गाच्या केलेल्या अमर्याद हानीचे हे फळ आपण भोगतोय,कदाचित यापुढेही असंख्य मोठ्या संकटाना सामोरे जावे लागू शकते,यात आम्हा युवकांच्या भविष्याचाच नव्हे तर वर्तमानाचा प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे आमच्या वर्तमानाच्या शाश्वततेसाठी आम्ही योगी ची सुरुवात करतोय.”
कार्यकारी मंडळाची घोषणा
योगीचे संस्थापक अध्यक्ष गिरीश पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात कार्यकारी मंडळाची घोषणा केली.उपाध्यक्ष-दिव्यांक सावंत,सचिव-प्रणील चौधरी,सहसचिव-योगेश पाटील,कोषाध्यक्षा-दीक्षा दिंडे,संपर्कप्रमुख-अमृत शेटे तसेच संचालक म्हणून पूर्वा जाधव,योगेश्वर जोशी,अजय पाटील,जयदीप झेंडे,वीरभूषण पाटील हे जबाबदारी सांभाळतील.
किसानी,जवानी आणि पाणी जपणे गरजेचे-जलपुरुष राजेंद्र सिंह राणा
आपल्या उद्घाटकीय मनोगतात बोलताना ते बोलले कि “आज कृषी क्षेत्रात अशाश्वतता निर्माण होत आहे,गावाचा तरुण भरकटला आहे,गावात पाणी नाहीये अश्या परिस्थितीत योगीच्या माध्यमातून युवकांनी उचलेलेले हे पाऊल उल्लेखनीय आहे.युवकांनी देशाच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला तर काहीही अशक्य नाही.मी वयाच्या २८व्या वर्षी पाण्याच काम सुरु केल आणि आयुष्यभर तेच करतोय,तसे सर्व युवकांनी या देशासमोर असलेले प्रश्न सोडवण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालण्याचे मी आवाहन करतो.”
शाश्वत विकासासाठी विज्ञानाची व पर्यावरणाची योग्य सांगड घालणे गरजेचे-वीणाताई गवाणकर
कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी व जेष्ठ पर्यावरणवादी लेखिका वीणाताई गवाणकर म्हणाल्यात कि “आज विद्यान प्रगतीचे अनेक यशोशिखरे गाठतो आहे.या विद्यानाचा पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने फायदा उचलल्यास,शाश्वत विकासाची योग्य दिशा प्राप्त होऊ शकेल,त्याने तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील स्वयंपूर्ण गावे निर्माण करू शकू!”
भारताचे युवक ग्रामस्वराज निर्माण करण्याची क्षमता ठेवतात-तुषारजी गांधी
कार्यक्रमाचे अध्यक्ष,महात्मा गांधींचे पणतू व जेष्ठ गांधीवादी तत्वज्ञ तुषार गांधी म्हणालेत कि “महात्मा गांधी जे रामराज्य सांगायचे,ते खरतर ग्राम राज्य आहे,त्यामुळे सर्वांनी गावांना शाश्वत करण्यासाठी झटायला हवे.तरुणांनी ह्या क्षेत्रात पुढाकार घेत कार्य करणे विशेष आहे.आपण ह्या बदलाचे वाहक बनून काम करायला हवे.”
“एक झाड माझही”
सध्या सोशल मिडीयावर विविध CHALLENGE दिले जात असून ते ट्रेंड देखील होत आहे.त्यात काही विधायक व्हावे,ह्या हेतूने “योगी” चे प्रमुख मार्गदर्शक मनोजजी गोविंदवार यांनी आवाहन केले कि प्रत्येकाने किमान एक देशी झाड लावावे व सोशल मिडीयावर ते पोस्ट करत आपल्या किमान तीन मित्रांना असे CHALLENGE द्यावे.
मिलिंदजी पगारे यांनी देखील योगीच्या कार्यास शुभेच्छा दिल्यात.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा जाधव यांनी तर कार्यक्रमाचे आभार योगी चे सचिव प्रणील चौधरी यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयेश पवार व दिव्यांक सावंत यांनी प्रयत्न केले.योगीच्या या ऑनलाईन उद्घाटन सोहळ्याचे पुनःप्रक्षेपण २१ जून रोजी योगीच्या अधिकृत सोशल मिडिया साईटवरून होणार असून या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.