रामानेच केले सीतेचे अपहरण; गुजरातमधील बारावीच्या अभ्यासक्रमात घोडचूक

0

गांधीनगर-सीतेचे अपहरण कोणी केले ? असा प्रश्न विचारला तर लहान मूलसुद्धा रावण असे उत्तर देतील.मात्र गुजरातमध्ये बारावीच्या संस्कृत पुस्तकात या साध्या प्रश्नाचे उत्तर चुकवण्यात आले आहे. रावणाने नाही तर रामाने सीतेचं अपहरण केल्याचं पुस्तकात छापण्यात आले आहे.

पुस्तकातील १०६ क्रमांकाच्या पानावर एका परिच्छेदात ही चूक छापण्यात आली आहे. प्रभू रामाचा एक सुंदर फोटो आणि त्यासोबत त्यांचे विचार मांडण्यात आले आहेत. यावेळी प्रभू राम लक्ष्मणला एक ह्रदयस्पर्शी संदेश देत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्यावेळी रामाने सीतेचं अपहरण केल्याची चूक छापण्यात आली आहे. संस्कृत साहित्याची ओळख करुन देणाऱ्या धड्यात ही चूक करण्यात आली आहे. हे पुस्तक फक्त इंग्लिश मीडिअम विद्यार्थ्यांसाठी होते.

गुजरात स्टेट बोर्ड ऑफ स्कूल टेक्स्टबुक्सचे कार्यकारी अध्यक्ष डॉ नितीन पेठानी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सुरुवातीला आपल्याला याची काही कल्पना नसल्याचे सांगितले. मात्र नंतर त्यांनी आपली चूक मान्य केली. भाषांतरात ही चूक झाली असून रावणाऐवजी रामाचं नाव छापलं गेलं असं त्यांनी सांगितलं. गुजराती पुस्तकात ही चूक झाली नसल्याचंही त्यांनी सांगितले.