रामेश्वर कॉलनीत तरुणावर हल्ला : दोन जणांना अटक

जळगाव : रामेश्वर कॉलनीतील मित्राच्या लग्नात नाचतांना तरूणाचा धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर तरुणावर दोन जणांनी तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. ही घटना मंगळवार, 22 मार्च रोजी रात्री 9 वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली.

दोघा आरोपींना पोलिसांकडून अटक
तुषार ईश्वर सोनवणे (18, जोशी वाडा, मेहरूण हा आई-वडील व भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. रामेश्वर कॉलनीतील त्याचा मित्र चेतन लाडवंजारी यांचे लग्न असल्याने मंगळवार, 22 मार्च रोजी रात्री 9 वाजता तुषार सोनवणे हा मित्रांसोबत लग्नाच्या ठिकाणी नाचायला गेला होता. त्याठिकाणी नाचत असताना सनी उर्फ बालकीसन जाधव याला धक्का लागला. याकारणानंतर दोघांमध्ये भांडण झाले व सनीने त्याच्या हातातील तीक्ष्ण हत्याने तुषारवर वार केले. यात तुषार गंभीर जखमी झाला. काही वेळातच सनीचा मित्र सचिन उर्फ कोंडा कैलास चव्हाण याने देखील तुषारला बेदम मारहाण केली. यावेळी उपस्थितांनी भांडण सोडवले व जखमी अवस्थेत तुषारला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकरणी तुषार ईश्वर सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयीत आरोपी सनी उर्फ फौजी बालकिसन जाधव (24) आणि सचिन उर्फ कोंडा कैलास चव्हाण (30, दोन्ही रा.प्रियंका किराणा जवळ, रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.