मुंबई:मुलींबद्दल बेताल वक्तव्य करणारे भाजपचे आमदार राम कदम यांना भाजपनं अभय दिलं आहे. ‘राम कदम यांनी माफी मागितली. आता आमच्यासाठी विषय संपला, असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कदम यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे कदमांवर भाजप कारवाई करणार नसल्याचे संकेत मिळत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी कदम यांची पाठराखण केली. ‘राम कदम यांनी माफी मागितली आहे. त्यामुळे आता हा विषय संपवायला हवा’, असं मत पाटील यांनी व्यक्त केलं. ‘कदम महिलांना नेहमीच मदत करतात.
एखादं वाक्य चुकून गेलं तर त्याचा अर्थ काय होता? जरी चुकीचा अर्थ निघत असला तरी त्यांनी माफी मागितल्यावर हा विषय संपवायला हवा. आमच्यासाठी तरी हा विषय आता संपलेला आहे’, असंही ते म्हणाले. मात्र कदम यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेच घेतील, असं सांगत पाटील यांनी काढता पाय घेतला .