राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणी आज निकाल

0

नवी दिल्ली – राम जन्मभूमी आणि बाबरी मशीदसंबंधीच्या वादग्रस्त प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. मशीद हा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नाही, या निकालाविरोधातील याचिकेवरही न्यायालय आज निर्णय देणार आहे.

इस्माईल फारूकी प्रकरणात सन १९९४मध्ये निर्णय देताना खंडपीठाने मशिदीत नमाज पठण करणे हा इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग नाही, असा निर्वाळा दिला होता. त्यानुसार वादग्रस्त जमिनीचे सरकारला अधिग्रहण करता येईल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले होते. या निकालाविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देईल.

मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती एस. अब्दुल नजीर यांचे खंडपीठ आज याप्रकरणी निर्णय देणार आहे. २० जुलैला खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला होता. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने ३० सप्टेंबर २०१० रोजी या प्रकरणी आपला निर्णय दिला होता. या निर्णयात खंडपीठाने अयोध्येतील विवादित जागेचे ३ भाग केले होते. एक राम जन्मस्थळासाठी, दुसरा निर्मोही आखाड्यासाठी आणि तिसरा भाग मशिदीसाठी, असे न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते.

मुघल सम्राट बाबर याने ६ डिसेंबर १५२८ साली अयोध्येत बाबरी मशीद बांधली होती. १९९२ ला हिंदू कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली. यावरुन उत्तर प्रदेशात दंगली झाल्या. या दंगलीत २००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. बाबरीच्या ठिकाणी पूर्वी राम मंदिर होते. राम मंदिर पाडून त्याठिकाणी बाबरी मशीद उभारण्यात आली, असा आरोप हिंदू संघटनांकडून करण्यात आला होता.