नवी दिल्ली : राम मंदिर बांधण्याचा समावेश काँग्रेस पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात केल्यास विश्व हिंदू परिषद त्यांना पाठिंबा देईल असे विधान विहिंपचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी केले आहे. विहिंपने राम मंदिरावरून काँग्रेसला पाठिंबा देण्याची ऑफर देणे म्हणजे भाजपला धक्का असल्याचे मानले जात आहे. काँग्रेस आता राम मंदिराबाबत काय भूमिका घेते व विहिंपच्या ऑफरबाबत काय प्रतिक्रिया देते हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
राम मंदिराचा पूर्ण लवकरात लवकर सोडवावा अशी इच्छा तमाम हिंदुत्त्ववादी संघटनांची आहे. मात्र, राम मंदिराचा प्रश्न सध्या सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने मोदी सरकारने सावध भूमिका घेतली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल यासाठी सरकार अध्यादेश काढणार नाही अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या सुरूवातीला दिलेल्या मुलाखतीत मांडली होती. त्यामुळे हिंदुत्ववादी संघटना सरकारच्या भूमिकेबाबत नाराज आहेत.
राम मंदिराचा मुद्दा मोदी सरकारला महत्त्वाचा वाटत नसल्याने काही प्रमाणात हिंदू समाजात नाराजी आहे. मोदी सरकारकडे बहुमत आहे. त्यामुळे हा विषय आता तातडीने सोडवावा अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, मोदी सरकार कोर्टाकडे बोट दाखवत आहे. त्यामुळे विश्व हिंदू परिषद राम मंदिराबाबत देशातील तमाम नागरिक आणि राजकीय पक्षांत मतैक्य घडविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मोदी सरकारला इशारा देण्यासाठीच काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात राम मंदिर बांधण्याचे वचन दिल्यास पाठिंबा देण्याची ऑफर विश्व हिंदू परिषदेने दिल्याचे मानले जात आहे.