राम मंदिराचा वाद सामोपचाराने सोडवा

0

रामदास आठवले यांची पत्रकार परिषदेत माहिती

पुणे : उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत अयोध्यावारी केली आहे. त्यांना तेथे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राम मंदिरासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे, ही बाबा चांगली असली, तरी राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्यासाठी आग्रही राहू नये. हा वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी तेथे एखादी संस्था उभारावी, जेणेकरून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत. अयोध्यामधील काही व्यक्तीकडून तिथे येण्याचे निमंत्रण मिळाले असून मीदेखील लवकरच अयोध्येला जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय समाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष गंगाधर आंबेडकर, एम. डी. शेवाळे, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, बाळासाहेब जानराव, परशुराम वाडेकर यावेळी उपस्थित होते.

मंदिर बेकायदेशीररित्या उभारू नका

अयोध्येला जाऊन तेथील हिंदू आणि मुस्लिम नागरिकांशी संवाद साधून हा वाद सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच राम मंदिराला आमचा विरोध नसून, ते बेकायदेशीररित्या उभारण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. कारण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जानेवारीमध्ये येणार आहे. त्यामुळे राम मंदिर बांधू इच्छीणार्‍यांनी काही काळ शांत रहावे. चर्चा करून तेथील काही जागा हिंदूंना, तर काही जागा मुस्लिम समाजासाठी द्यावी. उर्वरित बुद्ध विहार बांधण्यासाठी द्यावी, असे आठवले यांनी सांगितले.