नवी दिल्ली : भाजपचे राज्यसभा सदस्य विनय कटियार यांनी उत्तर प्रदेश निवडणुकीत पुन्हा राममंदिरचा मुद्दा उपस्थित केला आहे. गुरूवारी एका सभेत त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये भाजपला विजय मिळणे आवश्यक आहे, असे म्हटले. भाजपला उत्तरप्रदेशात बहुमत मिळाले तरच भाजपला राज्यसभेत बहुमत मिळवता येईल. जर पक्षाकडे राज्यसभेत बहुमत असेल तेव्हाच मंदिर बनवता येईल. त्यामुळे इथे होणारा विकास हा राम मंदिराशिवाय अर्धवट असल्याचे त्यांनी म्हटले. देशातील एकता व अखंडतेसाठी इथे मंदिर बनवावेच लागेल, असे त्यांनी ठासून सांगितले.
समान नागरी कायद्यावरही भाष्य
त्यांनी समान नागरी कायदा आणि तिहेरी तलाक सारख्या मुद्यांवरही भाष्य केले. तिहेरी तलाक हा मुस्लिम महिलांवर अन्याय आहे. त्यामुळे त्यांच्यावर बंदी आणणे आवश्यक आहे. देशात एका लग्नाचाच कायदा असला पाहिजे. नाहीतर तीन-चार लग्ने होतील. तीन-तीन-चार-चार मुले आणि कुटुंबातील सदस्य संख्या 20-25 होईल, असे ते म्हणाले.