अयोध्येचे महंत परमहंस महाराज दास यांचा इशारा
लखनऊ: अयोध्येत राम मंदिर उभारणीची 5 डिसेंबरपर्यंत घोषणा करा, अन्यथा 6 डिसेंबरला आत्मदहन करेन, असा इशारा अयोध्येचे महंत परमहंस महाराज दास यांनी दिला आहे. ते भदोही जिल्ह्यातील सीतामढी येथे बोलत होते. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळे राम मंदिराची उभारणी रेंगाळल्याचा आरोप देखील दास यांनी केला. दरम्यान राम मंदिराच्या उभारणीसाठी संत-महंतही आक्रमक झाले आहेत.
राम मंदिर उभारणीची घोषणा सरकारनं 5 डिसेंबरपर्यंत करावी. अन्यथा सीतामढीतील मातीचा लेप लावून मी चितेवर बसेन आणि आत्मदहन करेन, असा इशारा परमहंस महाराज दास यांनी दिला. संघ, भाजपा आणि विश्व हिंदू परिषदेच्या कूटनितीमुळेच अयोध्येत राम मंदिराची उभारणी होत नाही, असा आरोप दास यांनी केला. राम मंदिराची उभारणी होत नसल्यानं सीतामढीमध्ये ‘धिक्कार सभे’चं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला संबोधित करताना परमहंस महाराज यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यावर जोरदार टीका केली.