पुणे-महागणपतीच्या आशिर्वादाने रामराज्य प्रस्थापित व्हावे आणि प्रभू रामचंद्रांचे मंदिर लवकर पूर्ण व्हावे असे साकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी घातले. दर्शनासाठी मंदिरात येण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती, ती पूर्ण झाली असे सांगत गणरायाकडे जे मागितले, ते त्यालाच माहित आहे, असे ते यावेळी मिश्किलपणे म्हणाले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मोहन भागवत यांनी सदिच्छा भेट देत गणरायाची आरती आणि अभिषेक केला. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी आणि संघाचे पदाधिकारीही उपस्थित होते. अभिषेकाचे पौराहित्य करणाऱ्या मिलिंद राहुरकर गुरुजींनी केलेल्या मंत्रपठणाला साथ देत भागवत यांनी राममंदिर लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी प्रार्थना केली. त्यानंतर महाआरती व भागवत यांना स्मृतीचिन्ह देऊन ट्रस्टतर्फे सन्मानित करण्यात आले. ट्रस्टचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासोबत गणपती सदन या ट्रस्टच्या इमारतीला भेट देऊन ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहितीही भागवत यांनी घेतली.