अलिबाग । जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत जिल्ह्यासाठी 2017-18 करीता 113 गावांच्या प्राथमिक आराखड्यास तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. यात लोकसहभागातून कामे करावयाची आहेत. यामध्ये कर्जत तालुक्यातील 7, रायगड किल्ला परिसरातील 9 आणि तालुकास्तरीय समितीने निवडलेली 41 तसेच ग्राम सामाजिक परीवर्तन अभियानांतर्गत निवडलेली 56 अशा एकूण 113 गावांचा समावेश आहे. जलयुक्त शिवार अभियान जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी हे होते.
यावेळी प्रस्तावित केलेल्या कामांचे सविस्तर अंदाजपत्र डिसेंबर 2017 अखेर पूर्ण करुन जानेवारी 2018 मध्ये कामे सुरू करण्याबाबत सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल जाधव, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शेळके, आत्मा प्रकल्प संचालक, उपवनसंरक्षक मनिषकुमार, उपजिल्हाधिकारी रोहयो श्रीमती जैतू तसेच कृषि विभाग, वन विभाग, लघु सिंचन (जलसंधारण) विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद, सामाजिक वनीकरण विभाग या विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
निवडलेल्या गावांबाबत आढावा
जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानांतर्गत 2016-17 या वर्षात 38 गावे निवडण्यात आली आहे. या गावात विविध विभागांनी प्रस्तावित केलेल्या कामांपैकी शिल्लक कामे मार्च 2017 अखेर पूर्ण करण्यात यावीत, अशा सुचना सर्व विभागांना जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी दिली आहे, अशी माहिती देण्यात आली. याच बैठकीत 2017-28 साठी निवडलेल्या गावांबाबतही आढावा घेण्यात आला. या गावांमध्ये विविध यंत्रणांनी प्रस्तावित केलेल्या मृद आणि जल संधारणाच्या कामांच्या आराखड्यांना या सभेमध्ये तत्वतः मान्यता देण्यात आली.