रायन इंटरनॅशनल स्कूल तीन महिन्यांसाठी सरकारच्या ताब्यात

0

नवी दिल्ली | रायन इंटरनॅशनल स्कूलमधील विद्यार्थी प्रद्युम्न ठाकूर याची अतिशय भीषण, अमानवीय आणि अमानुष पद्धतीने हत्या केली गेल्याचे उघड झाले आहे. ‘पोस्टमॉर्टम रिपोर्ट’मध्ये हा धक्कादायक खुलासा झाला आहे. या कोवळ्या पोराला अशा पद्धतीने भोसकले गेले, की त्या स्थितीत कुणी धड-धाकड माणूसही 2-3 मिनिटांपेक्षा अधिक काळ जिवंत राहू शकला नसता. गळा खोलवर चिरल्याने जखमा इतक्या तीव्र होत्या की त्यातून शरीरातले बरेचसे रक्त काही सेकंदातच वाहून गेले असावे. दरम्यान, गुडगावचे वादग्रस्त रायन इंटरनॅशनल स्कूल तीन महिन्यांसाठी सरकारच्या ताब्यात ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

‘पोस्टमॉर्टम रिपोर्ट’नुसार अतिशय तीक्ष्ण, धारदार शस्त्रांनी प्रद्युम्नचा गळा कापण्यात आळा. त्याच्या जखमा 18 सेमी लांब आणि 2 सेंटीमीटर खोल होत्या. त्याचे कपडेही रक्ताने पूर्णपणे माखलेले होते. त्याच्या गळ्याच्या सर्व शिरा पूर्णपणे कापल्या गेल्या होत्या. त्याची अन्ननलिकाही छिन्न-विच्छिन्न होती. या सर्व गोष्टी त्याच्या मृत्यूचे कारण बनल्या.

या प्रकरणी पोलिस शनिवारी चार्जशीट दाखल करणार होते. पण त्याआधीच, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी शुक्रवारी प्रद्युम्नच्या पालकांशी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी हा हत्येचा तपास सीबीआयच्या हवाली करणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे पोलीस आता चार्जशीट दाखल करणार नाहीत. दोन दिवसांपूर्वीच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांची चौकशी केली होती. या प्रकरणात रोज नवीन धक्कादायक खुलासा होत आहेत. प्रद्युम्नच्या पालकांनी पहिल्या दिवसापासूनच सीबीआय चौकशीची मागणी लावून धरली होती. मुख्यमंत्री खट्टर यांच्या भेटीतही त्यांची हीच मुख्य मागणी होती.

दरम्यान, या हत्येप्रकरणी आरोपी असलेल्या बसवाहक अशोकच्या वकीलांनी या प्रकरणात त्यांच्या अशीलाला नाहक गोवले जात असल्याचा दावा केला आहे. अर्थात अशोकच्या भूमिकेबद्दल आणि आरोपी असण्याबद्दल सुरुवातीपासूनच शंका उपस्थित केल्या जात आहेत. बचाव पक्षाचा वकील म्हणून अशोकच्या वकिलांची भूमिका साहजिक असल्याचेही मानले जात आहे.