जळगाव : जळगाव तालुक्यातील रायपूर गावातील बेपत्ता भूषण जयराम तळेले (34) या बेपत्ता तरुणाचा खून झाल्याचे स्पष्ट झाले असून आरोपींनी खूनानंतर मृतदेह मध्यप्रदेशातील जंगलात पूरल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी नेले. यावेळी नेपानगर तहसीलदारांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला तर बर्हाणपूरच्या वैद्यकीय अधिकार्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. दरम्यान, पोलिसांनी खून प्रकरणी भिकन श्यामसिंग परदेशी व विठ्ठल प्रेमसिंग परदेशी (दोन्ही रा.रायपूर, ता.जि.जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पत्नीच्या पाठपुराव्यानंतर आरोपी जाळ्यात
भूषण जयराम तळेले (34, रायपूर, ता.जि.जळगाव) हा तरुण आपल्या पत्नी आशा यांच्यासह वास्तव्याला होता. चटईच्या कंपनीत काम करणार्या भुषणला नवीन काम मिळवून देण्याचा बहाणा करुन भिकन परदेशी आणि विठ्ठल परदेशी या दोघांनी संगनमत करून 17 एप्रिल रोजी भूषणला दुचाकीवर बसवून भुसावळला नेले. भुसावळात तिघांनी मद्य प्राशन केल्यानंतर पुन्हा मुक्ताईनगर गाठत तिथेही मद्य प्राशन केले व त्यानंतर तिघे मध्यप्रदेशातील नेपानगर परीसरातील फॉरेस्टच्या जंगलात गेल्यानंतर दोघा आरोपींनी भूषणच्या गुप्तांगावर मारहाण केली त्यानंतर दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जवळ असलेल्या नाल्यात पुरला. त्यानंतर ते दुचाकीने रायपूर येथे आले. त्यानंतर संशयत आरोपींनी वेगवेगळ्या नंबरवरून भूषणच्या पत्नीला फोन करून वेगवेगळ्या गावांची नावे सांगून भुषण सोबत असल्याचे सांगितले. त्यानंतर अनेक दिवस झाल्यानंतर पती घरी न आल्याने पत्नी सतत पोलिसांकडे पाठपुरावा करीत राहिल्याने सूत्र हलली व एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हादेखील दाखल करण्यात आला.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखविताच दोघांनी भूषणचा खून करून जंगलात पुरल्याची कबुली दिली. त्यानुसार त्यांच्याविरोधात खुनाचे वाढीव कलम लावण्यात आले.
शवविच्छेदनानंतर मयतावर अंत्यसंस्कार
गुरुवारी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अंनिस अहमद हवालदार गफूर तडवी, कॉन्स्टेबल सिद्धेश्वर डापकर, कॉन्स्टेबल सुधीर साळवे व दोन शासकीय पंच तसेच निंबोला पोलिस ठाण्याचे कर्मचारी विकास शर्मा यांच्या उपस्थितीत व नेपानगर तहसीलदारांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला. यावेळी बर्हाणपूरच्या वैद्यकीय अधिकार्यांनी जागेवरच शवविच्छेदन केले. दरम्यान, भूषणचा पुरलेला मृतदेह बाहेर काढताच कुटुंबियांनी एकच आक्रोश केला व शवविच्छेदनानंतर काही अंतरावरच मृत भूषणवर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला.