चोपडा ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील घटना
चोपडा– पेट्रोलिंगसाठी निघालेल्या पोलीस कर्मचार्याच्या ताब्यातील रायफलमधून गोळी सुटल्याने कर्मचारी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या घटनेने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
उमेश धनगर असे जखमी पोलीस कर्मचार्याचे नाव असून त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सूत्रांनी सांगितले. धनगर हे चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी आहेत. दरोडा प्रतिबंधासाठी ते दुचाकीवरून चोपडा ग्रामीणमध्ये गस्त घालत असताना खांद्याला लावलेल्या रायफलमधून अचानक गोळी सुटल्याने ते जखमी होवून एका शेताच्या रस्त्याच्या कडेला पडल्याचे काहींना आढळल्यानंतर त्यांना चोपडा शहरातील खाजगी दवाखान्यात हलवण्यात आले. सुदैवाने रायफलची गोळी त्यांच्या खांद्याला चाटून गेल्याने ते बचावले मात्र नेमकी घटना कशी व किती वाजेच्या सुमारास घडली याबाबत माहिती कळू शकली नाही. घटनेची माहिती कळताच चोपडा पोलीस उपअधीक्षक सदाशीव वाघमारे, पोलीस निरीक्षक किसनराव नजन-पाटील व अन्य अधिकार्यांनी धाव घेत माहिती जाणून घेतली.