रायरेश्‍वरावरील शिवशौर्य शिबिरात बालकांनी घेतली स्वच्छ चारित्र्याची शपथ

0

काठीकाठी, कुरघोडी, सुरपाट्यांची घेतली माहिती

नवी सांगवी : शिवकालीन मैदानी खेळ, कसरती, लाठीकाठी, कुरघोडी, सुरपाट्या, हुतुतु, संमोलन, अभ्यासातील एकाग्रता, योगा, श्‍लोक, निसर्गचित्रे, हरिपाठ, वारकरी पावल्या, नाटुकल्या, शिवकालीन शस्त्रे, शिवकालीन इतिहास, किल्ले आदींविषयी माहिती घेत रायरेश्‍वरावरील शिवशौर्य शिबीरात 180 शिबीरार्थिंनी स्वच्छ चारित्र्याची शपथ घेतली. शिव विचार जागर अभियान, शिवशाही संघटना, सणसबाबा आश्रम व मराठवाडा जनविकास संघ यांच्या संयुक्त विद्यमाने रायरेश्‍वरावर चार दिवसीय शिवशौर्य साहसी बाल संस्कार निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, ओयासिस कौन्सिलरचे आंतरराष्ट्रीय संमोहनतज्ज्ञ डॉ. राजेंद्र मोरे, राष्ट्रीय शिवकीर्तनकार डॉ. गजानन महाराज वाव्हळ, मुकुंद मासाळ, उद्योजक शंकर तांबे, राजेश गाटे, नागेश महाराज पवार, जांबुवंत महाराज तुळजापुरकर, नगरसेवक जगदिश किरवे, प्रा. क्षितीज कदम, काशीचे संस्कृत भाषा शास्त्री किसन महाराज शास्त्री, शिवशाही संघटनेचे संस्थापक अमित थोपटे, सचिन मांगडे, आण्णा महाराज साबळे , डॉ. सचिन जगताप, सणसबाबा आश्रम प्रमुख नामदेव महाराज किंद्रे, हनुमंतराव जाधव, प्रतिक वर्‍हाडी आदी उपस्थित होते.

मुलांना कणखर बनवले पाहिजे
शिबीरामध्ये पहिल्या दिवशी नगरसेवक जगदिश किरवे यांनी शिबिरार्थिंचे स्वागत करीत भोर येथील पंत सचिवांचा राजवाडा दाखवला. उद्घाटनानंतर ‘मी संमोहनाचा जादुगार’ या सत्रात डॉ. राजेंद्र मोरे यांनी अभ्यासातील एकाग्रतेविषयी मार्गदर्शन केले. सायंकाळच्या सत्रात शिवकालीन मैदानी खेळ, कुरघोडी, सुरपाट्या, हुतुतु पार पडले. रात्री शेकोटी संमेलनाच्या सत्रात शिबीरार्थींनी आपल्यातील अंगभुत कला दाखवल्या. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना अरुण पवार म्हणाले की, मुले ही देवाघरची फुले असली, तरी त्यांना लोण्याचा गोळा बनवू नका. जेणेकरून ते उन्हात गेले की वितळून जातील. आपल्या मुलांना कणखर बनवले पाहिजे, ही काळाची गरज आहे. मुला-मुलींना साहसी शिबिरांना पाठवून सह्याद्रीच्या कातळासारखे मजबूत बनवा. म्हणजे त्यावर देशाच्या भविष्याचे सुंदर लेणे कोरता येईल.

पारंपरिक मैदानी खेळांनी प्रारंभ
दुसर्‍या दिवसाचा प्रारंभ योगा व श्‍लोक पठणाने झाला. या सत्रात किसन महाराज शास्त्री यांनी मार्गदर्शन केले. त्या नंतर प्रा. राजश्री ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मी शिल्पकार कागदांचा’ सत्र पार पडले. प्रा. भारती किर्दक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मी सखा रंगांचा’ या सत्रात शिबीरार्थिंनी मुक्तछंदात निसर्ग चित्र काढले. सायंकाळच्या सत्रात नागेश महाराज पवार व जांबुवंत महाराज तुळजापुरकर यांच्या नेतृत्वाखाली हरीपाठ व वारकरी पावल्यांचा आनंद लुटला. रात्री स्वयंस्फुर्त समुह नाट्य सादर झाली. तिसर्‍या दिवसाचा प्रारंभ पारंपरिक भारतीय मैदानी खेळांनी झाला. त्यानंतर अंगावर शहारे आणणारे गिर्यारोहण करून शिबीरार्थी रायरेश्‍वर मंदिराजवळ पोहचले. तिथे शिबीरार्थींना रायगडावरील शिवसमाधी जवळील पवित्र माती देवून स्वच्छ चारित्र्याची शपथ देण्यात आली. रात्री वक्तृत्व व गायन स्पर्धा संपन्न झाल्या.

कसरती व लाठीकाठीने प्रारंभ
चौथ्या दिवसाचा प्रारंभ शिवकालीन कसरती व लाठीकाठीने झाला. या सत्रात शिवयौध्दा मर्दानी आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष प्रतिक वर्‍हाडी व शितल वर्‍हाडी यांनी शिबीरार्थींना शिवकालीन शस्त्रांची सखोल माहिती दिली. दुपारच्या सत्रात डॉ. गजानन महाराज वाव्हळ यांच्या ‘संगीत बाल शिवायाण’ हा विशेष भाग सादर केला. यामध्ये शिवजन्म, स्वराज्य शपथ, अफजलखान वध, शाहिस्तेखान फजिती, आग्रा भेट व राज्याभिषेक सोहळा इत्यादी प्रसंग सादर केले. शोभायात्रेने संगीत बाल शिवायाणची सांगता झाली. शिबीराचा सांगता समारंभ रामायनाचार्य मनोहर बापू महाराज शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यांनी सद्यस्थितीत अशा शिबीरांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

शिबीरात 180 शिबीरार्थींचे तानाजी, येसाजी, कान्होजी, नेताजी, प्रतापराव, हंबीरराव, बाजी अशा सात संघात विभाजन करण्यात आले होते. यांचे नेतृत्व प्रतिक वर्‍हाडी, ऋषीकेश शेलार, मुकेश चव्हाण, प्रा. राजश्री ढोरे, शितल वर्‍हाडी, प्रा. भारती किर्दक, विश्‍वजीत पाटील, माधव मोरे, गणेश अडागळे, ऋत्विक उदावंत, माऊली ढवळे, लिना ढोरे, प्रतिक्षा टिळेकर, श्रध्दा पवार, ऋषीकेश ठाकुर, ओंकार शेलार, श्रृती गजघाटे, ऋतुजा गोळे, रोहिणी वाव्हळ, अर्चना थोपटे, श्रावणी चितारे यांनी केले. तर सर्व शिबीरार्थींच्या प्रवासाची व्यवस्था अरूणपवार यांनी केली.