जळगाव । येथील जी.एच.रायसोनी अभियांत्रिकीतील सिव्हील, कॉम्पुटर, माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन व इलेक्ट्रिकल विभागातर्फे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे प्रश्न, अभ्यासक्रम पद्धती, पालकांच्या समस्या आदी विषयांवर चर्चा करून शिक्षक पालक यांच्यात समन्वय साधता यावा या उद्देशाने पालक सभा बोलाविण्यात आली होती. यावेळी बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
स्व:शिस्त अंगीकारावी
आपल्या पाल्याच्या भविष्यासाठी पालक सर्वोतोपरी प्रयत्न करीत असतो. तरीही उच्च शिक्षण घेऊन नोकरी न मिळणे, यामागचे कारण अध्यापही पालक शोधू शकले नाहीत. बहुधा आपला पाल्य महाविद्यालयात वेळेवर जात आहे किंवा नाही, जात असेल तर वर्गात बसतो की नाही या बाबत विचारणा घरी करण्यात येत नसावी. यामुळे महाविद्यालय व विद्यार्थी यांच्यातील संवाद पालकापर्यंत पोहचत नाही. शिक्षण घेण्याची स्व:ताची आत्मीयता असावी. शिक्षणाविषयी विद्यार्थ्यांमध्ये आत्मियता निर्माण व्हावी यासाठी महाविद्यालयाकडून परिपूर्ण तयारी करून घेतली जाते. तसेच विद्यार्थ्याने स्व:शिस्त अंगीकरावी कारण तुमच्या यशस्वीतेमागे शिस्तबद्धता सर्वात महत्वाची आहे असे मत प्राचार्य डॉ.प्रभाकर भट यांनी व्यक्त केले.
पालकांचा सत्कार
महाविद्यालयातून देण्यात येणारे शिक्षण इतर सोई सुविधा यांच्यात कोणत्याही प्रकारची कमतरता महाविद्यालयाकडून राहत नाही. तसेच शासनाच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना 75 टक्के हजेरी आवश्यक आहे तेव्हाच शिष्यवृत्तीचा लाभ मिळू शकतो. परंतु विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी पडतो त्यामुळे एकत्रित समन्वय साधने खूप महत्वाचे आहे. असे प्रा.शंतनू पवार यांनी शैक्षणिक अहवाल सादर करताना सांगितले. महाविद्यालयात आपापल्या शाखेत प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे सत्कारही यावेळी करण्यात आले. प्रसंगी सूत्रसंचालन प्रियंका भोळे तर आभार प्रा.मयुरी गचके यांनी मानले. यावेळी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.