रावेतचे नगरसेवक ओव्हाळ यांचा सत्ताधारी भाजपशी ‘काडीमोड’

0

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल, अनेक राज्यात दलितांवर अन्याय याच्या निषेधार्थ
वारंवार सूचना देवूनही कचर्‍याचा प्रश्‍न सत्ताधार्‍यांना वर्षभरात सोडविता आल्या नसल्याची राग
पिंपरी-चिंचवड : महापालिकेतील रावेतचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी सत्ताधारी भाजपाशी ‘काडीमोड’ घेतला असल्याची घोषणा मंगळवारी केली. तसेच पुढील राजकीय वाटचालीत सत्ताधारी भाजपपासून अलिप्त राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल आणि उत्तर प्रदेशासह अनेक राज्यात दलितांवरील अन्यायाच्या घटना वाढल्या आहेत. देशात एकात्मतेला धोका असून नागरिकांमध्ये असुरक्षित असल्याची भावना निर्माण झाल्यामुळे हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच शहरातील कचर्‍याचा प्रश्‍न वर्ष उलटूनही मार्गी लागलेला नसल्याचाही राग असल्याचे सांगितले.

सरकारविरोधातील भावनेचा आदर ठेवून निर्णय
ओव्हाळ म्हणाले, “अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात बदल करत त्यातील दोन मुद्दे शिथिल करून हा कायदा पांगळा करण्यात आला आहे. देशातील उत्तर प्रदेश व इतर राज्यात दलित व बहुजन समाजातील नागरिकांवर होणारा अन्याय वाढला आहे. भीमा-कोरेगाव दंगलीच्या प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाट आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील दलित समाजाच्या लोकांच्या पदोन्नत्या शासनामध्ये रखडल्या आहेत. लोकांमध्ये असंतोष असून तो दिसून येतो. लोकांच्या भावनेचा आदर ठेवून हा निर्णय घेतलेला आहे.’’

माझ्यावर शिस्तभंगाची कारवाई करावीच
पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता येऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. शहरातील महत्त्वाचा कचर्‍याचा प्रश्‍न भाजपला सोडविता आलेला नाही. अधिकार्‍यांना वारंवार सूचना देऊन, सांगून देखील कचर्‍याच्या समस्येकडे लक्ष दिले जात नाही. या मुद्यामुळे मी ‘भाजप’पासून या पुढील राजकीय कारकीर्दीत अलिप्त राहणार आहे. भाजपची विचारसरणी व धोरणाच्या आपण विरोधात आहोत. पक्षातील कोणत्याही व्यक्ती किंवा नेत्याच्या विरोधात नाही. माझ्या निर्णयावर पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करावी. होणारे परिणाम भोगण्यासाठी तयार आहे, असेही ओव्हाळ यांनी स्पष्ट केले.

विधानसभा भाजपच्या विरोधात लढविणार
आगामी विधानसभा निवडणुकी पिंपरी विधानसभा मतदारसंघातून आपण लढणार आहोत. मात्र, ही निवडणूक कोणत्याही परस्थितीत भाजपकडून लढणार नाही. भाजपच्या विरोधात निवडणूक लढविणार आहे. सर्वसमावेश विचारणीसरणीच्या राजकीय पक्षासोबत किंवा वेळप्रसंगी अपक्ष निवडणूक लढविण्याची आपली तयारी असल्याचेही बाळासाहेब ओव्हाळ यांनी स्पष्ट केले.