रावेत : पावसामुळे रावेत, वाल्हेकरवाडी परिसरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. लहान-मोठ्या खड्ड्यांमधील खडी बाहेर येऊन त्या जागेवर वाहनांची सतत आदळआपट सुरू असल्याने लहान खड्डे मोठे झाले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघातांची संख्याही वाढली आहे. मार्च ते मे या कालावधीत येथील काही प्रमुख रस्त्यांचे महापालिका प्रशासनाने डागडुजी केली होती. परंतु, पावसाच्या फटकार्याने रस्त्यांवरील खडी उडू लागल्याने या कामांविषयी संशय व्यक्त केला जात आहे. दुरवस्था झालेल्या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे.
उपनगरांमध्ये रस्त्यांची दुरवस्था
गेल्या काही वर्षांत शहराचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. मात्र, अद्यापही उपनगरांमध्ये चांगले रस्ते नाहीत. पावसाळ्यात तर रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट होते. रस्त्यांवर खड्डे तयार झाल्यानंतर अपघात होतात. अनेक जण जायबंदीदेखील झाले आहेत. त्यानंतर ओरड वाढली की, महापालिका प्रशासन तात्पुरत्या स्वरुपात मुरूम टाकून खड्डे बुजवते. ही तात्पुरती मलमपट्टी काहीही कामाची नसल्याची तक्रार नागरिकांकडून होत आहे.
कोट्यवधी रुपये पाण्यात
महापालिका दरवर्षी शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. परंतु, डागडुजी चांगल्या प्रकारे होत नसल्याने हा खर्च पाण्यात जात आहे. रावेत, वाल्हेकरवाडीत काही ठिकाणी रस्ता उंच तर, काही ठिकाणी सखल भाग असल्याने या भागात पावसाचे पाणी साचून राहते. त्या ठिकाणी खड्डा तयार होऊन अपघात होत आहेत. त्यामुळे महापालिकेने ठेकेदारांना तातडीने खड्डे बुजवण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.