रावेत परिसरात वाहनचालकांची होते कसरत

0

रस्ता अर्धवट बुजविल्याने धोका वाढला

रावेत : महावितरण कंपनीतर्फे चिंचवडमधील वाल्हेकरवाडी ते रावेत या मार्गावर आणि बिजलीनगर ते किवळे दरम्यान टाकण्यात येणार्‍या केबलसाठी मोठी चर खोदल्याने रस्ता अरुंद झाला आहे. ठेकेदाराने केबल टाकल्यानंतर खोदलेला रस्ता पुन्हा व्यवस्थित न बुजविल्यामुळे येथे खड्डे झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. तसेच पादचार्‍यांनाही याचा त्रास होतो आहे. रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला उघड्या अवस्थेतील नैसर्गिक नाला आहे. अर्धवट अवस्थेत बुजविण्यात आलेली चर आणि नाल्यामुळे रस्ता केवळ आठ ते दहा फूट राहिल्याने वाहने चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी नवीन वाहनचालकांना नाला लवकर लक्षात येत नाही. त्यामुळे नाल्यात वाहने जाऊन अपघात होत आहेत.

वाहनचालक घसरून पडतात
दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेंतर्गत बिजलीनगर येथील मुख्य विद्युत केंद्रातून किवळे येथे राबविण्यात येत असलेल्या योजनेसाठी वाल्हेकरवाडी येथील संत नामदेव चौक ते रावेत दरम्यान मोठी चर रस्त्याच्या कडेला खोदली होती. काम पूर्ण झाल्यानंतर ही चर व्यवस्थित बुजविणे अपेक्षित असताना ती अर्धवट अवस्थेत बुजवली आहे. त्याचा राडारोडा रस्त्यावर पडल्याने दुचाकी वाहनचालक घसरून पडून किरकोळ स्वरूपाचे अपघात झाले आहेत. मुळातच हा रस्ता अरुंद असून, येथून वाहनांची वाहतूक वर्दळ असते. या मार्गाचा वापर अनेक वाहने द्रुतगती मार्ग, रावेत, डांगे चौक आदी ठिकाणी जा-ये करण्यासाठी करीत असतात. ठेकेदाराने तत्काळ रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी वाहनचालक करीत आहेत.

या रस्त्यावर पथदिवे बंद
वाल्हेकरवाडी-रावेत मार्गावरील हा रस्ता अत्यंत धोकादायक असून रात्रीच्या वेळी अनेकदा या मार्गावरील पथदिवे बंद असतात. त्यातच रस्ता अरुंद आणि धोकादायक वळण असल्याने वाहनचालकांना पुढील वाहनांचा अंदाज येत नाही. त्यामुळे येथे अनेकवेळा अपघात घडले आहेत. काही वाहने नाल्यात कोसळली आहेत. त्यामध्ये काहींना प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे मुळातच अरुंद असणारा रस्ता या कामामुळे अधिक अरुंद झाल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. काही महिन्यांपूर्वी निगडी ते डांगे चौक दरम्यान टाकण्यात येणाजया जलवाहिनीकरिता रस्ता उखडण्यात आला होता. या कामाच्या पूर्णत्वास काही महिने उलटले होते. त्यानंतर खोदलेला रस्ता व त्याकरिता काढण्यात आलेले पेव्हिंग ब्लॉक नव्याने बसविण्यात आले. काही दिवसांतच रस्ता आणि पेव्हिंग ब्लॉग पुन्हा उखडून टाकले.