रावेत येथे मृतदेह आढळला

0
देहूरोड : देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत रावेत, भोंडवे कॉर्नरजवळ मंगळवारी सकाळी मृतदेह आढळला. दारूच्या नशेत तोल जाऊन पदपथावरील सिमेंटच्या ब्लॉकवर पडल्यामुळे डोक्याला इजा होऊन त्याचा मृत्यु झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
भीमा पांडुरंग जाधव (वय 37, रा.रावेत) असे मृतावस्थेत आढळलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सकाळी 7 च्या सुमारास हा प्रकार उघडकिस आला. भीमा हा दारूच्या आहारी गेला होता. त्यामुळे सदैव नशेत असायचा, अशी माहिती मिळाली आहे. सोमवारी रात्री या भागातून नशेच्या कैफात जात असताना तो तोल जाऊन पडला असावा. त्यात पदपथालगत लावण्यात आलेल्या सिमेंट ब्लॉकवर त्याचे डोके आदळल्याने वर्मी मार बसल्याने त्याचा मृत्यु झाला असावा, असा अंदाज पोलीसांनी व्यक्त केला आहे. त्याचे वडील पांडुरंग जाधव यांनी यासंदर्भात कुणावरही संशय नसल्याचे सांगितल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले. देहूरोड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.