रावेरमध्ये श्री विसर्जनासाठी पोलिस प्रशासन सज्ज

0

डीजे वाजल्यास दाखल होणार गुन्हा : ध्वनी प्रदूषण नियंत्रकाद्वारे आवाजाची होणार चाचणी

रावेर- शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. यंदादेखील डीजेवर बंदी असल्याने पोलिस प्रशासनाने डीजे दिसल्यास तो जप्त करून गुन्हा दाखल करण्याचा ईशारा दिला आहे तर मिरवणुकीत वाजवल्या जाणार्‍या आवाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी ध्वनि प्रदूषण नियंत्रक यंत्रदेखील दाखल झाले असून त्याची चाचपणीदेखील शुक्रवारी घेण्यात आली. रविवारी लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार असल्याने पोलिस प्रशासनाने चोहो बाजूनी तयारी केली आहे. पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ अधिकारी व कर्मचार्‍यांनी बंदोबस्ताची आखणी केली आहे शिवाय शहरातील विविध भागात लावण्यात येणारे बॅरीगेटस्बाबत आखणीदेखील करण्यात आली आहे. रावेर पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे व त्यांच्या सहकार्‍यांनी रस्त्यावरील खड्डे बुजवले असून नागझिरी कुंड स्वच्छ केला आहे. महावितरणच्या पी.एस.चौधरी व योगेश पाटील यांच्या टीमने विसर्जन मार्गावर पथदिवे लावल्याने गणेश भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.