रावेरला अतिरीक्त गाड्यांची प्रतिक्षा

0

रावेर । रावेर तालुका हा सर्वाधिक केळीचे उत्पन्न घेणारा म्हणून राज्यभरात ओळख आहे. याच तालुक्यात पालसारखे थंड हवेचे ठिकाण असून जिल्ह्याच्या ठिकाणी नोकरीसाठी ये-जा करणार्‍यांची संख्यादेखील लक्षणिय आहे. मागील 25 वर्षांपासून रावेर रेल्वे स्थानकावर अधिक एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. माजी खासदार हरिभाऊ जावळे यांच्या प्रयत्नातून केवळ दोन रेल्वे गाड्या सोडल्या तर आजपर्यंत सर्वांच्या पदरात निराशाच पडलेली आहे. रावेरहून बाहेरगावी नोकरीसाठी ये-जा करतांना चाकरमाना वर्ग हा महामार्गाने न जाता रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतो. महामार्गापेक्षा अधिक सुरक्षितता रेल्वेत असल्याने बहुतांश प्रवासी रेल्वेचाच मार्ग निवडतात. मात्र या ठिकाणी अधिकच्या गाड्या नसल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. देशात सर्वत्र बुलेट ट्रेनचे वारे सुरु आहे. मात्र शासनाने बुलेट रेल्वे चालविण्यापेक्षा पॅसेंजर गाड्यांनाच वेळेवर चालविण्याची मागणी प्रवाशांमधून होत असते.

या गाड्यांची आहे मागणी
विविध प्रवाशांकडून सचखंड एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, सुरत-खंडवा पॅसेंजर, पुणे-पटणा एक्स्प्रेसची मागणी अनेक वर्षांपासून आहे. माजी खासदार हरिभाऊ जावळे यांनी प्रवाशांची व रावेरकरांची समस्या लक्षात घेवून कामायनी व ताप्तीगंगा एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळविण्यात यश आले होते परंतु त्यानंतर केंद्रात, राज्यात आणि रावेर लोकसभेचे खासदारही भाजपाचे असून सुध्दा मागील अडीच वर्षांपासून रावेरकरांच्या नशिबी एकही गाडी मिळालेली नाही.

भुसावळ-चाळीसगाव अंतर खुप असून एक्स्प्रेस गाड्यांच्या यांच्यासाठी सुमारे 50 ते 60 किलोमिटर अंतर आवश्यक असते. रावेर रेल्वे स्टेशनला थांबा मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. रावेकरांसाठी लवकरच नवीन थांब्याच्या माध्यमातून मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.
– रक्षा खडसे, खासदार, रावेर लोकसभा

लोकप्रतिनिधी सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे. आम्ही सचखंड, महानगरी गाड्यांच्या थांब्यासाठी 1997 पासून लढत आहे. विद्यमान खासदार रक्षा खडसे यांनी या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष देवून समस्या सोडवावी व वरील दोन्ही गाड्यांना थांबा मिळाल्यास प्रवाशांचा त्रास कमी होईल.
– प्रशांत बोरकर, प्रवासी

केवळ दोनच गाड्यांना थांबा
रावेर रेल्वे स्थानकावर सध्या कुशीनगर, लोकमान्य टिळक गोरखपुर, कामायनी, ताप्तीगंगा, जनता सर्व एक्स्प्रेस गाड्या तर दोन पॅसेंजरला थांबा आहे. रावेर हे गेट ऑफ महाराष्ट्र असल्याने आणि आगाराने मोठे असल्याने येथे अधिक रेल्वे गाड्यांना थांबा अतिआवश्यक आहे.

यापुर्वी माजी खासदार केंद्रात आणि राज्यात विरोधी सरकार असतांना कामायनी व ताप्तीगंगा एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळवून दिला होता. परंतु आता सर्वत्र भाजपा असतांनादेखील मागील अडीच वर्षात एकाही गाडीला थांबा मिळवता आलेला नाही.